Join us  

Share Market Knowledge: शेअर बाजारातील 'बुल' आणि 'बेअर' म्हणजे काय?... जाणून घ्या 

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 01, 2021 5:44 PM

गेल्या १५ ते २० वर्षांचा निफ्टी किंवा बीएसईचा इंडेक्स चार्ट पहिला तर आपण या मतावर येऊ शकतो की बाजाराची दिशा ही बुलिश आहे. यात अधूनमधून काही दिवस बाजार खाली येतो त्यास 'करेक्शन' म्हणतात.

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी

मागील भागात आपण गुंतवणूकदार प्रकार आणि त्यांचा बाजारावरील परिणाम हे समजून घेतले. आता 'बुल' म्हणजे काय आणि 'बेअर' म्हणजे काय हे समजून घेऊ. 

बुल: बुल म्हणजे बैल. बीएसई म्हणजेच मुंबई स्टॉक एक्स्चेंज या ठिकाणी बुल सिम्बॉल आपणास दिसतो. बैलाची शिंगे वरील बाजूस असतात. म्हणजेच खालून वरील दिशेला असतात. याचाच अर्थ चढत्या कमानीत असतात आणि बैल आपल्या संरक्षणासाठी शिंगावर घेऊनच वर उचलतो. म्हणूनच बाजार जेव्हा वरच्या दिशेला सरकत असतो तेव्हा तो बुलिश आहे असे म्हणतात. खरेदीदार असल्याने बाजार चढत्या कमानीत राहतो. 'बुल रन' म्हणजे काही दिवस, काही आठवडे बाजाराची दिशा सतत चढी असणे. कोरोना काळात बाजार सपाटून आपटला. परंतु, आपण सर्वांनी पहिले की, ज्या प्रमाणात आपटला त्याच्या काही पटींनी तो 'व्ही' शेप मध्ये वरही आला. मार्च २०२० मधील मोठी घसरण पुढील काही महिन्यात भरून निफ्टी आणि बीएसई कोरोना पूर्वीच्या त्यांच्या उच्चतम पातळीला गाठून नोव्हेंबर २०२० मध्ये त्यापेक्षा ५० टक्क्यांनी वाढून स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. यालाच एक मोठा 'बुल रन' असे म्हणता येईल. 

'बुल रन'मध्ये खरेदी अधिक होते आणि विक्री कमी. बाजार वर-वर सरकणार या सकारात्मक ऊर्जेने गुंतवणूकदार अधिकाधिक रक्कम बाजारात गुंतवतात. एकूणच सर्व बाजूंनी सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि बाजार वर-वर सरकत जातो. गेल्या १५ ते २० वर्षांचा निफ्टी किंवा बीएसईचा इंडेक्स चार्ट पहिला तर आपण या मतावर येऊ शकतो की बाजाराची दिशा ही बुलिश आहे. यात अधूनमधून काही दिवस बाजार खाली येतो त्यास 'करेक्शन' म्हणतात. अशी करेक्शन बाजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी लाभदायकच असते. कारण बाजार जेव्हा खाली येतो तेव्हा शेअरचे भाव विक्रीच्या माऱ्याने खाली आलेले असतात आणि तेव्हाच नव्याने सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदारांना किंवा पूर्वी वाढीव भावात शेअर विक्री केलेल्या गुंतवणूकदारांना बाजारात प्रवेश करण्याचाही संधी प्राप्त होते. जेव्हा असे होते तेव्हा बाजार पुन्हा नव्या जोमात वर सरकायला तयार होतो. 

जागतिक सकारात्मक परिस्थिती, व्याजाचे कमी दर, महागाईला लगाम किंवा महागाई स्तर स्थिर किंवा खाली येणे, सर्व स्तरातून मागणी वाढीव असल्याने उलाढाल मोठ्या प्रमाणात होणे अशी सकारात्मक कारणे 'बुल रन'ला प्रोत्साहन देत असतात. 

बेअर: बेअर म्हणजे अस्वल. अस्वल हे शिकार करताना प्राण्यास खाली पाडते. बाजार विक्रीच्या माऱ्याने खाली आणून मग पडलेल्या भावात पुन्हा खरेदी करायची अशी मानसिकता धारण करून बाजारातील व्यवहाराकडे पाहणाऱ्या ट्रेडर्सना बेअर म्हणतात. जागतिक मंदी, वाढीव व्याजदर, आणीबाणी सदृश परिस्थिती, आर्थिक संकटे, ढासळती अर्थव्यवस्था आणि एकूणच निराशामय वातवरण यातून बेअरिश ट्रेंड सुरू होतो आणि शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढतो. डिसेंबर २००७ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान असा बेअर ट्रेंड भारतीय शेअर बाजाराने अनुभवला आहे. पण असा ट्रेंड काही कालावधीसाठी असतो आणि परिस्थिती बदलते. नवी ऊर्जा बाजारात येते आणि पुन्हा खरेदी सुरु होते आणि मार्केट बुलिश होते. 

हेही वाचाः गुंतवणूकदारांचे चार प्रकार अन् त्यांच्या खरेदी-विक्रीवर ठरणारे शेअर बाजाराचे चढ-उतार... जाणून घ्या!

हेही वाचाः शेअर बाजारात 'ट्रेडिंग' करायचं असेल Stop Loss माहीत हवाच; 'शॉर्ट सेल'ही ठरू शकतो 'गेम चेंजर'  

फेब्रुवारी २००९ नंतर पुन्हा मार्केट वाढले आणि खऱ्या अर्थाने एप्रिल २०१४ नंतर पुन्हा 'बुल रन' सुरू झाला. कोरोना काळात मार्च-२०२० मध्ये मार्केट बेअरिश झाले होते. परंतु, पुढील काही महिन्यात जोमाने वर आले हे काहींनी प्रत्यक्ष पहिले आणि अनुभवले असेल. बेअर ट्रेंड काही विभागांत पाहावयास मिळतो. जसे वाहन उद्योग. गेल्या काही वर्षात वाहन उद्योग मंदीच्या छायेत होता. म्हणूनच वाहन क्षेत्रांतील कंपन्यांचे शेअर्सचे भाव खाली आले. 

बुल आणि बेअर या दोन्ही अवस्था शेअर मार्केटला वर आणि खाली खेचत असतात. बेअर मार्केटमध्ये खाली आलेले भाव जेव्हा गुंतवणूकदारांस आकर्षक वाटतात आणि बाजारात भांडवल (रोख रक्कम) वाढते तेव्हा पुन्हा नव्या जोमाने खरेदी सुरू होते. बाजाराच्या आरोग्यासाठी बुल आणि बेअर या दोनही अवस्था उत्तम मानल्या जातात. खरा गुंतवणूकदार आणि ट्रेडर या दोन्ही अवस्थांचा फायदा करून घेत असतो. 

पुढील भागात फेस व्हॅल्यू / आयपीओ / लिस्टिंग / लिस्टिंग गेन म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ. (क्रमशः)

टॅग्स :शेअर बाजार