- प्रसाद गो. जोशी
'देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक बाबींमुळे जगभरातील शेअर बाजार मंदीत असतानाही भारतातील शेअर बाजाराने आगेकूच सुरूच ठेवली. सप्ताहाच्या अखेरीस इन्फोसिसमधील घडामोडींमुळे बाजार खाली आला असला, तरी सप्ताहाचा विचार करता त्यामध्ये वाढच झालेली दिसून येत आहे. सतत सहाव्या सप्ताहात बाजाराचा निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला आहे.मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात गतसप्ताह तेजीचा राहिला. मंगळवारी बाजाराला स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी होती. त्यामुळे तो दिवस तसेच शुक्रवारचा दिवस वगळता बाजार वाढीव पातळीवर बंद होताना दिसला. सप्ताहाच्या अखेरीस इन्फोसिसमुळे निर्देशांक खाली आले, तरी संवेदनशील निर्देशांक ३१५२४.६८ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ३११.०९ अंशांनी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्ताहाअखेरीस ९८३७.४० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १२६.६० अंश वाढ झाली. सप्ताहाच्या अखेरीस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली आणि बाजारात घसरण सुरूझाली. मात्र कालांतराने पुन्हा खरेदीदार सक्रिय झाल्याने ही घसरण रोखली जाऊन बाजार थोडासा वर गेला. मात्र त्या दिवशी निर्देशांकात घटच झाली. दुसºया दिवशी इन्फोसिसने समभागांची पुनर्खरेदी करण्याच्या प्रस्तावावर संमती दिल्याने त्याचा परिणाम सोमवारी बाजारात दिसू शकतो. गतसप्ताहात जगभरातील बाजारांना निराशा आणली. अमेरिकेमधील व्याजदराबाबत निश्चित धोरण न ठरल्याने जगभरातील शेअरबाजार मंदीत राहिले. त्याचप्रमाणे भारतात जाहीर झालेली चलनवाढ आणि आयात-निर्यात व्यापारातील आकडेवारीनेही निराशाच केली. असे असतानाही बाजारात तेजी दिसून आली, हे विशेष!तीन विमा कंपन्यांचा येणार आयपीओसरकारी क्षेत्रातील दोन विमा कंपन्यांसह खासगी क्षेत्रातील एका विमा कंपनीने प्रारंभिक भाग विक्रीसाठीचे प्रस्ताव भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी)कडे दाखल केले आहेत. या भाग विक्रीतून सुमारे २० हजार कोटी रुपये जमविले जाणार आहेत.सरकारी क्षेत्रातील न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी तसेच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (जीआयसी) ने याआधीच सेबीकडे प्रारंभिक भाग विक्रीसाठीचे प्रस्ताव दाखल केले असून, त्यामधून प्रत्येकी ६५०० कोटी रुपये जमा होणार आहेत.खासगी क्षेत्रातील एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाइफ या कंपनीने १८ आॅगस्ट रोजी आपला प्रस्ताव सेबीकडे दाखल केला आहे. या प्रस्तावामध्ये प्रारंभिक भाग विक्रीतून ७५०० कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न विविध आस्थापनांकडून होत आहे. आतापर्यंत चालूृ वर्षात बाराहून अधिक आस्थापनांनी प्रारंभिक भाग विक्रीचे प्रस्ताव सादर केले आहेत.