Join us

सातव्या वेतन आयोगात शिफारशींच्या दुप्पट वाढ?

By admin | Updated: February 17, 2016 02:50 IST

सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींपेक्षा दुप्पट वाढ देण्याची सूचना सचिवांच्या समितीने केली असल्याचे वृत्त आहे

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींपेक्षा दुप्पट वाढ देण्याची सूचना सचिवांच्या समितीने केली असल्याचे वृत्त आहे. या शिफारशी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच एक जानेवारीपासून लागू होतील. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या वेतन आयोगाने अर्थमंत्र्यांना आपला अहवाल यापूर्वीच सादर केला आहे. यात वेतनात २३.५५ टक्के वाढीची शिफारस करण्यात आली आहे; मात्र केंद्रीय कर्मचारी संघटनांचा या वाढीला विरोध आहे. या संघटनांच्या मतानुसार कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात १४.२७ टक्केच फायदा होणार आहे. ही मागील ७० वर्षातील सर्वात कमी वाढ असेल, असे त्यांचे मत आहे. याच प्रश्नावरून ११ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.सहाव्या वेतन आयोगानेही २० टक्के वाढीची शिफारस केली होती. अर्थात प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी ही वाढ २००८ मध्ये ४० टक्के करण्यात आली होती, हे विशेष. दरम्यान, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अमलात आणल्यानंतर सरकारच्या तिजोरीवर १.०२ लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.