Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेवा कर विभागाची कर संकलनात बाजी

By admin | Updated: December 24, 2014 00:14 IST

गेल्या आर्थिक वर्षात मंदीमुळे अप्रत्यक्ष कर संकलनात घट झाल्यानंतर कर संकलन वाढविण्याबाबत विशेष जागरूक मोहीम राबविल्याच्या पार्श्वभूमीवर चालू

मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात मंदीमुळे अप्रत्यक्ष कर संकलनात घट झाल्यानंतर कर संकलन वाढविण्याबाबत विशेष जागरूक मोहीम राबविल्याच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत झालेल्या कर संकलनात सेवा कर विभागाने बाजी मारल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अजून तीन महिने असले तरी आतापर्यंत सेवा करापोटी वसूल झालेल्या रकमेने दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून आले आहे. अप्रत्यक्ष करामध्ये सेवा कर, अबकारी कर, सीमा शुल्क आदी करांचा समावेश होतो. यापैकी सेवा कर आकारणीच्या यादीमध्ये गेल्या अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली. परिणामी, अनेक गोष्टींवर नव्याने सेवा कर लागू झाला आहे. यंदाच्या वर्षी अप्रत्यक्ष कराचे निर्धारित लक्ष्य साडेसात लाख कोटी रुपये इतके आहे. यापैकी सेवा करासाठी चार लाख १५ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. तथापि, निर्धारित लक्ष्य गाठणे शक्य नसले तरी, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत किमान ३५ टक्के अधिक कर संकलन होण्याचा अंदाज सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अंदाजे, पावणेतीन लाख कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम जमा होईल, तर दुसरीकडे अबकारी कर आणि सीमा शुल्क विभागाला तुलनेने कर संकलन करण्यात फारसे यश आलेले नाही. मंदीचे सावट जरी संपले असले तरी, अद्यापही उत्पादन क्षेत्राने जोर पकडला नसल्याने त्याचा फटका विशेषत: अबकारी कराला बसल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)