Join us

सोयाबीन उगवणीच्या तक्रारींची गंभीर दखल

By admin | Updated: November 4, 2014 08:57 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या.

संतोष येलकर, अकोलायावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. सोयाबीन उगवणीबाबतच्या या तक्रारींची राज्याच्या कृषी खात्याने गंभीर दखल घेतली आहे. बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईची अद्ययावत माहिती सादर करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.खरीप हंगामात पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या; मात्र दुबार पेरणी करूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. यासंदर्भात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत सोयाबीन उगवणीबाबत तक्ररींची माहिती कृषी विभागाच्या प्रत्येक विभाग व जिल्हा स्तरावरील कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. त्यामध्ये कंपनीनिहाय तक्रार असलेल्या सोयाबीन बॅगची माहिती मागविण्यात आली होती; मात्र यासंदर्भात कृषी आयुक्तालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आली. तसेच बियाणे उगवले नसल्याने संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना बियाणे व रोखीने देण्यात आलेल्या नुकसान भरपाईची अद्ययावत माहितीदेखील कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा कार्यालयांकडून कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्यात आली नाही.राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे, त्यादृष्टीने सोयाबीन बियाण्याच्या उगणवीबाबत तक्रारी आणि शेतकऱ्यांना देण्यात आलेली नुकसान भरपाई यासंदर्भात माहितीमध्ये तफावत राहू नये, यासाठी अद्ययावत माहिती सादर करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाच्या कृषी संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदांच्या कृषी विकास अधिकाऱ्यांना २९ आॅक्टोबर रोजी पत्राद्वारे दिले. त्यानुसार ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील विभागनिहाय प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोयाबीन उगवणीबाबतच्या तक्रारी व बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नुकसान भरपाई, याबाबतची अद्ययावत माहिती कृषी आयुक्त कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगितले की, खरिप हंगामात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नुकसान भरपाई, यासंदर्भात कृषी आयुक्तालयामार्फत अद्ययावत माहिती मागविण्यात आली आहे.