मुंबई : दिल्लीत डिझेल गाड्यांची नोंदणी बंद करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शेअर बाजारांत घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0८ अंकांनी घसरून २५,0४४.४३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा तीन महिन्यांचा नीचांक ठरला आहे. गेल्या ८ दिवसांत सेन्सेक्स सात वेळा घसरणीसह बंद झाला आहे. ब्ल्यू चिप कंपन्यांतील घसरण सेन्सेक्सच्या गटांगळीला मुख्यत: कारणीभूत ठरली. एका क्षणी सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या खाली गेला होता. दुपारी तो २४,९३0.४३ अंकांपर्यंत खाली आला होता. निवडक कंपन्यांच्या समभागांत खरेदी झाल्यामुळे नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस २0७.८९ अंकांची अथवा 0.८२ टक्क्यांनी घसरण नोंदवून सेन्सेक्स २५,0४४.४३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,६00 अंकांच्या खाली घसरला होता. नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस तो ७२.८५ अंकांची अथवा 0.९५ टक्क्यांची घसरण नोंदवून ७,६१0.४५ अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स ५९३.६८ अंकांनी उतरला आहे. ही घसरण २.३१ टक्के आहे. एनएसई निफ्टीही आठवड्यात १७१.४५ अंकांनी अथवा २.२0 टक्क्यांनी उतरला. टाटा मोटर्स, एमअँडएम, मारुती सुझुकी, अशोक लेलँड, आयशर मोटर्स यांचे समभाग २.९८ टक्क्यांनी उतरले. त्यामुळे वाहन क्षेत्राचा निर्देशांक १.७१ टक्क्यांनी खाली आला. बीएसई बँक्सेक्स २.२५ टक्क्यांनी उतरला. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक यांचे समभाग ३.६0 टक्क्यांपर्यंत उतरले.
तीन महिन्यांच्या नीचांकावर सेन्सेक्स
By admin | Updated: December 12, 2015 00:03 IST