वस्तू आणि सेवाकर विधेयकावर निर्माण झालेला पेच, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेमुळे जगभरातील बाजारांमध्ये कमी झालेली उलाढाल, परकीय वित्तसंस्थांनी कायम ठेवलेले विक्रीचे धोरण, अशा विविध कारणांनी गतसप्ताहात मुंबई शेअर बाजार सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये खाली आला. संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टी अनुक्रमे २६ हजार आणि ७,७०० अंशांच्या खाली आल्याने गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.मुंबई शेअर बाजार हा गतसप्ताहात गुरुवारचा अपवाद वगळता खाली येत होता. गुरुवारीच केवळ बाजार वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहभरात संवेदनशील निर्देशांक ५९३.६८ अंशांनी घसरून २५,०४४.४३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १७१.४५ अंशांनी खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस तो ७,६१०.४५ अंशांवर बंद झाला. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी विक्री कायमच ठेवली. या सप्ताहभरात या संस्थांनी १,००० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.संसदेच्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर होणार की नाही, याबाबतची साशंकता असल्याने बाजारामध्ये नैराश्याची भावना वाढीला लागली आहे. मात्र, त्यामुळे बाजार खालीच आला. याशिवाय पुढील सप्ताहामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने बाजाराचे लक्ष त्याकडे लागले आहे.गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेमध्ये सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्था अमेरिकेत व्याजदर वाढल्यास अधिक फायदा मिळण्याची अपेक्षा बाळगून असल्याने त्यांनी विक्रीचे धोरण कायम ठेवले. गतसप्ताहात या संस्थांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्था आणि परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३,१२४.३१ कोटी रुपयांची विक्री केली.पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आपले उत्पादन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आधीच घसरत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये यामुळे आणखी घट झाली आहे. बाजारात आता या किमतींनी गेल्या सहा वर्षांमधील नीचांक गाठला आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये सातत्याने घट होत आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास भारत सज्ज असल्याच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विधानाने बाजारात रुपयाच्या मूल्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
सेन्सेक्स, निफ्टीने गाठला तीन महिन्यांचा तळ
By admin | Updated: December 13, 2015 22:50 IST