Join us

सेन्सेक्स ३९0 अंकांनी उसळला

By admin | Updated: October 10, 2014 04:00 IST

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने तात्काळ व्याजदर वाढविणार नसल्याचा संकेत दिल्याने गुरुवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली.

मुंबई : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने तात्काळ व्याजदर वाढविणार नसल्याचा संकेत दिल्याने गुरुवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. व्यापक आधारावर खरेदी झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९0 अंकांनी वर चढून २६,६३७.२८ अंकांवर बंद झाला. ब्रोकरांनी सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील तपशील जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारातील धारणा मजबूत झाली. व्याजदर वाढणार नाहीत, हे स्पष्ट झाल्याने बाजारात खरेदीला गती आली. त्यामुळे सेन्सेक्स उसळला.३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी सकारात्मक कल घेऊनच उघडला. त्यानंतर तो लवकरच २६,६८८.७0 या उच्चस्तरावर पोहोचला. दिवस अखेरीस तो ३९0.४९ अंकांच्या अथवा १.४९ टक्क्यांच्या तेजीसह २६,६३७.२८ अंकांवर बंद झाला. २४ सप्टेंबरनंतरच्या काळातील सेन्सेक्सचा हा सर्वोच्च स्तर आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २६,७४४.६९ अंकांवर बंद झाला होता. या आधीच्या तीन सत्रांत सेन्सेक्स ३८३ अंकांनी तुटला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी ११७.८५ अंकांनी म्हणजेच १.५ टक्क्यांनी वाढून ७,९00 अंकांचा टप्पा पार करून गेला. दिवस अखेरीस तो ७,९६0.५५ अंकांवर बंद झाला. निफ्टीचा हा चार दिवसांचा सर्वोच्च स्तर ठरला आहे. आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात मजबूत धारणा दिसून आली. ब्रोकरांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानेही शेअर बाजारातील धारणा मजबूत झाली. सेन्सेक्समधील ३0 पैकी २५ कंपन्या लाभात राहिल्या. भेलचा शेअर सर्वाधिक ८.३७ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल हिंदाल्को, एसबीआय यांच्या शेअर्सला लाभ मिळाला. विप्रोसह इतर चार कंपन्यांचे शेअर्स मात्र कोसळले. क्षेत्रवार निर्देशांकांपैकी भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक ३.0१ अंकांनी वाढला. रिअल्टी २.६१ टक्क्यांनी, तर बँकेक्स २.५१ टक्क्यांनी वाढला.