Join us

सेन्सेक्सची सलग दुसऱ्या सत्रात तेजी

By admin | Updated: January 26, 2016 02:32 IST

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५0 अंकांनी वाढून २४,४८५.९५ अंकांवर बंद झाला.

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५0 अंकांनी वाढून २४,४८५.९५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची ही सलग दुसऱ्या सत्रातील तेजी ठरली.युरोपात आणखी प्रोत्साहन उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच जपान सरकारही अशा काही उपाययोजना करू शकते. अमेरिकेतील वादळानंतर कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारातील धारणा मजबूत राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी सकारात्मक टापूत उघडला होता. त्यानंतर त्यात आणखी सुधारणा झाली. एका क्षणी सेन्सेक्स २४,६५0.५७ अंकांवर पोहोचला होता. तथापि, नंतर नफावसुलीचे सत्र सुरू झाल्याने तो थोडा खाली आला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स ५0.२९ अंकांच्या अथवा 0.२१ टक्क्यांच्या वाढीसह २४,४८५.९५ अंकांवर बंद झाला. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स ४७३.४५ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,४३६.१५ अंकांवर बंद झाला. १३.७0 अंकांची अथवा 0.१८ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.धातू क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक १.५८ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल टिकाऊ ग्राहक वस्तू, आरोग्य सेवा, जमीनजुमला, आयटी आणि बँकिंग या क्षेत्राचे निर्देशांक वाढले. सेन्सेक्समधील टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक २.७३ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल सन फार्माचा समभाग वाढला. एचडीएफसी बँक, ओएनजीसी, कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लि., हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज, टीसीएस, आयटीसी लि., बजाज आॅटो, इन्फोसिस आणि आरआयएल यांचे समभाग वाढले. सेन्सेक्समधील ३0 पैकी १५ कंपन्यांचे समभाग वाढले. उरलेल्या कंपन्यांचे समभाग घसरले. व्यापक बाजारातही तेजीचा कल पाहायला मिळाला. बीएसई स्मॉलकॅप 0.९४ टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.२४ टक्क्यांनी वाढला. तत्पूर्वी, शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी ७६९.८३ कोटी रुपयांचे समभाग विकले.