मुंबई : आर्थिक सुधारणांना गती मिळेल, अशी आशा निर्माण झाल्यामुळे शेअर बाजारातील घसरणीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२३ अंकांनी वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. ब्रोकरांनी सांगितले की, वस्तू आणि सेवाकर विधेयकाबाबत आशादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्याच वेळी मान्सूनही पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती उतरू लागल्या आहेत. या सर्व बाबी सकारात्मक आहेत. त्यामुळे बुधवारी बाजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली. रिफायनरी, बँकिंग, वाहन, ऊर्जा आणि धातू या क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांत नव्याने खरेदी झाली.सकाळी बाजारात विक्रीचा जोर होता. त्यामुळे ३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स घसरणीचा कल दर्शवीत होता. नंतर मात्र चित्र पालटले. खरेदीचा जोर वाढला. सेन्सेक्स वर चढला. सत्राच्या अखेरीस २८,५0४,९३ अंकांवर बंद होताना सेन्सेक्सने ३२२.७९ अंकांची अथवा १.१५ टक्क्यांची वाढ नोंदवली. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने २८१.१७ अंक अथवा 0.९९ टक्के घसरण नोंदवली होती. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १0४.0५ अंकांनी अथवा १.२२ टक्क्यांनी वाढून ८,६३३.५0 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी १६ एप्रिलनंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २२ कंपन्यांचे समभाग आज तेजीत होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग ४.२६ टक्क्यांची वाढ नोंदवून सर्वोच्च स्थानी राहिला. एमअँडएम, सन फार्मा, बजाज आॅटो आणि एचडीएफसी यांचे समभागही वाढले. या उलट लुपिन, टीसीएस आणि भारती एअरटेल यांचे समभाग घसरले.आजची तेजी व्यापक होती. बीएसई स्मालकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.८६ टक्के आणि १.३0 टक्के वाढले. किरकोळ गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीचा लाभ त्यांना मिळाला. बाजाराची व्याप्ती सकारात्मक राहिली. १,७७0 कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. १,0५५ कंपन्यांचे समभाग घसरले. ११८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल मात्र घसरून २,९२५.६६ कोटींवर आली. काल ती ३,२0३.५८ कोटी रुपये होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सेन्सेक्स ३२३ अंकांनी वाढला
By admin | Updated: July 22, 2015 23:44 IST