Join us

सेन्सेक्स पुन्हा उसळला

By admin | Updated: January 3, 2015 01:53 IST

बँकिंग क्षेत्रात समभाग खरेदीला जोर आल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांनी पुन्हा एकदा उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८0 अंकांनी वर चढला.

मुंबई : बँकिंग क्षेत्रात समभाग खरेदीला जोर आल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांनी पुन्हा एकदा उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८0 अंकांनी वर चढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी ११.४५ अंकांनी उसळला.सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील बँकांच्या समभागांना मोठी मागणी दिसून आली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय क्षेत्रातील नियामक आणि वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक पुण्यात सुरू आहे. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणांना गती देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर या बैठकीत विचारमंथन होणार आहे. या बैठकीमुळे शेअर बाजारातील वातावरण उल्हसित झाले. मुंबई शेअर बाजार सकाळी तेजीने २७,५२१.२८ अंकांवर उघडला. नंतर तो २७,९३७.४७ अंकांपर्यंत वर चढला. सत्र अखेरीस थोडासा खाली येऊन २७,८८७.९0 अंकांवर बंद झाला. ३८0.३६ अंकांची अथवा १.३८ टक्क्यांची वाढ सेन्सेक्सने नोंदविली. हा सेन्सेक्सचा ४ आठवड्यांचा उच्चांक आहे. सेन्सेक्स गेल्या सहा सत्रांपासून तेजीत आहे. या सहा सत्रांच्या काळात त्याने ६७९.२९ अंकांची वाढ मिळविली आहे. या आठवड्यात सेन्सेक्सने ६४६ अंकांची वाढ नोंदविली आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी ८,४00 अंकांचा टप्पा ओलांडून वर चढला होता. सत्र अखेरीस थोडासा खाली येऊन तो ८,३९५.४५ अंकांवर बंद झाला. १११.४५ अंकांची अथवा १.३५ टक्क्यांची तेजी त्याने नोंदविली. सर्वच प्रमुख बँकांचे समभाग आज उसळले. एचडीएफसी लि., आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ महाराष्ट्र आणि युनायटेड बँक आॅफ इंडिया यांना तेजीचा लाभ झाला. बँकिंग क्षेत्राशिवाय भांडवली वस्तू, आयटी, ऊर्जा, टेक आणि रिअल्टी या क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही तेजीत होते. भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्राने डिसेंबरमध्ये मागील दोन वर्षांतील विक्रमी वाढ मिळविली असल्याचे एचएसबीसीने जाहीर केले आहे. त्यामुळेही बाजारात तेजी आली आहे. देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणूकदार बाजाराकडे वळले. विदेशी संस्थांनी काल १८.२0 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली, असल्याचे बीएसईमधील तात्पुरत्या आकडेवारीवरून दिसून आले.नव्या वर्षाच्या सुटीनंतर उघडलेले सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया येथील शेअर बाजार 0.१६ टक्के ते १.0७ टक्के वाढले. चीन, जपान आणि तैवान येथील बाजार आज बंद होते. युरोपातील बाजार मात्र सकाळच्या सत्रात मंदीचा कल दर्शवीत होते. फ्रान्स,जर्मनी, ब्रिटन येथील बाजार 0.४५ टक्के ते 0.७५ टक्के खाली चालत होते. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २५ कंपन्यांचे समभाग वाढले. ५ कंपन्यांचे समभाग घसरले. बँकाव्यतिरिक्त लाभ मिळविणाऱ्या इतर कंपन्यांत टाटा मोटर्स, भेल, एलअँडटी, इन्फोसिस, टाटा स्टील, ओएनजीसी, टाटा पॉवर, हिंदाल्को यांचा समावेश होता. १,७८७ कंपन्यांचे समभाग वाढले. १,१४९ कंपन्यांचे समभाग घसरले. १0६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल २,९९२.८0 कोटी रुपये झाली. काल ती १,९२८.२६ कोटी होती.