मुंबई : एक दिवसाच्या नरमाईनंतर शेअर बाजारांनी गुरुवारी पुन्हा एकदा तेजीचा मार्ग धरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७,८९५.९७ अंकांनी वर चढला. भांडवली वस्तू, जमीन-जुमला आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. ग्रीसच्या कर्ज संकटाला बाजूला सारून शेअर बाजाराने गेल्या १0 दिवसांतील नववी उसळी घेतली. आजचा दिवस तसा अत्यंत अस्थिर राहिला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २६,६६0.२२ अंकांवर घसरणीसह उघडला होता. त्यानंतर तो सकारात्मक झोनमध्ये आला. ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये खरेदीला जोर आल्यामुळे एका क्षणी तो २७,९६८.७५ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्र अखेरीस १६६.३0 अंकांची अथवा 0.६0 टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,८९५.९७ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स ७४.७0 अंकांनी घसरला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३७.१५ अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी वाढून ८,३९८ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील वाढीला बजाज आॅटो, गेल, एलअँडटी आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या समभागातील तेजीने हातभार लावला. एचडीएफसी, एलआयसी आणि देवान हाऊसिंग यांचे समभागही वाढले. आशियाई बाजारात नरमाईचा कल राहिला. चीन, जपान, हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.0२ टक्के ते ३.४६ टक्के घसरले. तैवान येथील बाजार 0.८४ टक्क्यांनी वाढला. युरोपीय बाजारांतही नरमाईचाच कल राहिला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.0१ टक्के ते 0.२१ टक्के घरसले.
सेन्सेक्स पुन्हा तेजीत; १६६ अंकांची उसळी
By admin | Updated: June 26, 2015 00:10 IST