मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आज नव्या उच्चांकाला स्पर्श केला; मात्र कोळसा खाणवाटपावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. सर्वोच्च न्यायालयाने १९९३ ते २०१० यादरम्यान झालेले कोळसा खाणवाटप अवैध असल्याचे स्पष्ट केले. हे खाणवाटप रद्द करणे किंवा न करण्याबाबतचा निकाल न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत राखून ठेवला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विशेषत: धातूशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सची मोठी विक्री झाली. तथापि, मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने १७ अंकांची बढत नोंदवत नव्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाला. आज २०१ अंकांची तेजी नोंदवणारा ३० शेअर्सवाल्या सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारात २६,६३०.७४ अंक या विक्रमी पातळीला स्पर्श केला. यापूर्वी १९ आॅगस्ट रोजी सेन्सेक्सने २६,५३०.६७ अंक ही विक्रमी पातळी गाठली होती. तथापि, नंतर विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्सचा लाभ मर्यादित झाला आणि अखेरीस १७.४७ अंक वा ०.०७ टक्क्यांच्या तेजीसह २६,४३७.०२ अंकाच्या नव्या विक्रमावर बंद झाला. १९ आॅगस्ट रोजी सेन्सेक्सने २६,४२०.६७ अंकाचा विक्रम केला होता. दुसरीकडे निफ्टी मजबूत संकेतांसह उघडल्यानंतर आपली सार्वकालिक उच्चांकी पातळी ७,९६८.२५ अंकावर पोहोचला. यापूर्वी २२ आॅगस्ट रोजी निफ्टीने ७,९२६.०५ अंकाच्या पातळीला स्पर्श केला होता. तथापि, नंतर विक्रीमुळे निफ्टी ६.९० अंक वा ०.०९ टक्क्यांच्या हानीसह ७,९०६.३० अंकावर बंद झाला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स, निफ्टीचा नव्या उच्चांकाला स्पर्श
By admin | Updated: August 26, 2014 00:52 IST