मुंबई : भारतीय शेअर बाजार बुधवारी नव्या उंचीवर पोहोचला व कामकाज संपायच्या आधीच्या तासात शेअर विक्रीत तो खाली आला. मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स त्याच्या सर्वाधिक उंचीवर २८,२९४.०१ पोहोचून नफा वसुली व कमकुवत जागतिक कल असल्यामुळे १३० अंकांनी घटून २८,०३२.८५ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही ४४ अंकांचे नुकसान सोसून ८,४०० अंकांपेक्षा खाली आला.कामकाजादरम्यान सेन्सेक्सने २८,२९४.०१ अंकावर पोहोचून नव्या विक्रमाला पोहोचला व निफ्टी ८,४५५.६५ अंकाच्या विक्रमी उंचीवर गेला. बाजार सेन्सेक्सच्या घसरणीवर बंद व्हायचा हा सलग दुसरा दिवस आहे. रुपयातही घसरण दिसली. मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्सने कामकाजाच्या प्रारंभी नवी उंची गाठली होती. या रेकॉर्ड स्तरावर विदेशी कंपन्यांकडून विक्री वाढली व त्यामुळे तो खाली आला. कामकाजादरमम्यान एकवेळ सेन्सेक्स २७,९६३.५१ अंकांवर पोहोचला होता. शेवटी सेन्सेक्स १३०.४४ अंक किंवा ०.४६ टक्क्यांचे नुकसान सोसून २८,०३२.८५ अंकांवर बंद झाला. मंगळवारी तो १४.५९ अंकांच्या नुकसानीनंतर बंद झाला होता.याच प्रकारे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ८,४५६.६५ या नव्या विक्रमी अंकाला पोहोचून शेवटी ४३.६० अंक किंवा ०.५२ टक्क्यांचे नुकसान सोसून ८,३६२.३० अंकांवर बंद झाला होता. कामकाजाच्या दरम्यान तो ८,३६०.५० अंक खाली घसरला. मंगळवारी निफ्टी ४.८५ अंक घटला होता. बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले की, बाजार शक्यतो मर्यादित क्षेत्रात राहिला व शेवटच्या ९० मिनिटांत त्यात सुधारणा झाली. टाटा मोटार्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, सनफार्मा, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, एसबीआय, सेसा स्टरलाईट, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, भेल व कोल इंडियामुळे बाजारावर दडपण राहिले. त्याचवेळी एचडीएफसी, डॉ. रेड्डीज लॅब, एल अँड टी, हिंद युनिलिव्हर, बजाज आॅटो व भारती एअरटेलने ही घसरण रोखायला काही प्रमाणात हातभार लावला. किरकोळ गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे मिड कॅप व स्मॉल कॅपमध्येही घसरण झाली.या दरम्यान, अस्थायी आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी निव्वळ १०१.९८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. आशियाई बाजार मिळताजुळता राहिला. चीन, हाँगकाँग, जपान व दक्षिण कोरियामध्ये घसरण झाली तर सिंगापूर व तैवान लाभदायक होते. कामकाजाच्या प्रारंभी युरोपीय बाजाराला मागणी होती.व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी म्हणाले की, भारतीय बाजार सकारात्मक कल घेऊन सुरू झाले; परंतु जसा दिवस सरकत होता तशी त्यात घसरण झाली. सेन्सेक्सच्या ३० शेअरपैकी २२ मध्ये नुकसान झाले व ८ फायद्यात येऊन बंद झाले. सेन्सेक्सच्या कंपन्यांत टाटा स्टील ३.०८, सेसा स्टरलाईट २.७५, गेल इंडिया २.३०, टाटा मोटार्स २.२९, भेल १.९९, एनटीपीसी १.९४ व सनफार्मा १.७७ टक्के नुकसानीत गेले. ओएनजीसी, कोल इंडिया, सिप्ला, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही घसरण झाली. डॉ. रेड्डीज लॅब २.४५ टक्के चढला, हिंद युनिलिव्हरमध्ये १.१९, एचडीएफसीमध्ये १.०१, बजाज आॅटोमध्ये १.०१ व भारती एअरटेलमध्ये ०.८९ टक्के लाभ झाला.
विक्रमी उंचीवर पोहोचून सेन्सेक्स, निफ्टी घसरले
By admin | Updated: November 20, 2014 01:32 IST