मुंबई : तीन आठवड्यांच्या उच्चांकावर असलेल्या भारतीय शेअर बाजारांत बुधवारी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५१.५६ अंकांनी उतरला. बेस रेट मोजण्याची नवी पद्धती येणार असल्यामुळे बँकांच्या समभागांत विक्रीचा जोर राहिला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केल्या जाण्याच्या शक्यतेचाही बाजारावर परिणाम झाला.काल पतधोरण आढावा जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने बँकांचा बेस रेट मोजण्यासाठी नवी पद्धती आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा परिणाम आज बाजारावर दिसून आला. वस्तुत: सकाळी बाजारात चांगले वातावरण होते. बीएसई सेन्सेक्स २६,२५६.४२ अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर नफा वसुली सुरू झाल्याने घसरणीचा श्रीगणेशा झाला. सेन्सेक्स २६,0४१.६८ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरपर्यंत तो थोडा सुधारला. तथापि, ५१.५६ अंकांची अथवा 0.२0 टक्क्याची घसरण होऊन तो २६,११७.८५ अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ३९३.६६ अंकांनी वाढला होता.५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी २३.५५ अंकांनी अथवा 0.३0 टक्क्यांनी घसरून ७,९३१.३५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ७,९७९.३0 आणि ७,९१0.८0 अंकांच्या मध्ये हेलकावे खाताना दिसून आला. बँकांच्या समभागांना विक्रीचा मोठा फटका बसला. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग १.८३ टक्क्यांनी खाली आले. घसरलेल्या अन्य कंपन्यांत भेल, इन्फोसिस, एचडीएफसी, टाटा मोटर्स, कोल इंडिया, एचयूएल, एलअँडटी, विप्रो आणि हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश आहे. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १४ कंपन्यांचे समभाग घसरले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स ५१.५६ अंकांनी उतरला
By admin | Updated: December 3, 2015 02:09 IST