मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ४७0 अंकांनी घसरून २६,३७0.९८ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा गेल्या आठ महिन्यांतील नीचांक ठरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही घसरून ८ हजार अंकांच्या खाली आला आहे. वास्तविक भारताच्या चालू खात्यातील तूट घटली आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवरही सकारात्मक आर्थिक संकेत आहेत. या सर्व बाबींकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. काल शेअर बाजार उसळला होता. त्यानंतर आज गुंवतणूकदारांनी नफा वसुलीलाच प्राधान्य दिल्याने बाजार घसरला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर आणखी वर चढून तो २७ हजार अंकांपर्यंत गेला होता. त्यानंतर नफा वसुलीचा झपाटा सुरू झाला आणि सेन्सेक्स २६,३४८.९३ अंकांपर्यंत खाली आला. सत्राच्या अखेरीस ४६९.५२ अंकांची अथवा १.७५ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २६,३७0.९८ अंकांवर बंद झाला. २0 आॅक्टोबर २0१४ रोजी सेन्सेक्स २६,४२९.८५ अंकांवर बंद झालाहोता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी १५९.१0 अंकांनी अथवा १.९६ टक्क्यांनी घसरून तो ७,९६५.३५ अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारात मात्र तेजीचा कल राहिला. चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील समभाग 0.२६ टक्के ते १.६८ टक्के वाढले. युरोपीय बाजारही सकाळच्या सत्रात तेजी दर्शवीत होते. बाजारातील एकूण उलाढाल वाढून २,५0८.२८ कोटी झाली. आदल्या सत्रात ती २,0७५.६२ कोटी रुपये होती. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,८५८ कंपन्यांचे समभाग घसरले. ७८१ कंपन्यांचे समभाग वाढले. ११0 कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स ४७0 अंकांनी घसरला
By admin | Updated: June 12, 2015 10:14 IST