Join us

जीएसटीवर तोडग्याच्या शक्यतेने सेन्सेक्स तेजीत

By admin | Updated: November 27, 2015 00:07 IST

संसदेत अडकून पडलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुरुवारी शेअर बाजारांत तेजी परतली.

मुंबई : संसदेत अडकून पडलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुरुवारी शेअर बाजारांत तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८३ अंकांनी वाढून २५,९५८.६३ अंकांवर बंद झाला. नोव्हेंबरचे डेरिव्हेटिव्ह सौदे डिसेंबरपर्यंत लांबविण्याचे करार झाल्याचा लाभही बाजाराला झाला. डेरिव्हेटिव्ह सौद्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारात मंदीची चाल होती. या दोन दिवसांत सेन्सेक्सने ९३ अंकांची घसरण नोंदविली होती. ब्ल्यू चिप कंपन्यांत खरेदी वाढल्यामुळे या घसरणीला ब्रेक लागला. ब्रोकरांनी सांगितले की, जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार काँग्रेसशी बोलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून लटकलेले हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीएसई सेन्सेक्स १८२.८९ अंकांनी अथवा 0.७१ टक्क्यांनी वाढून २५,९५८.६३ अंकांवर बंद झाला. ९ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ५२.२0 अंकांनी अथवा 0.६७ टक्क्यांनी वाढून ७,८८३.८0 अंकांवर बंद झाला. टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक ५.५१ टक्क्यांनी वाढले. त्याखालोखाल सन फार्माचे समभाग ३.९६ टक्क्यांनी वाढले. अमेरिकेतील पवन ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्याची योजना रद्द केल्याची घोषणा केल्याचा फायदा कंपनीला झाला. याशिवाय गेल, आयटीसी, एमअँडएम, आरआयएल, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे समभागही वाढले. हिंदाल्को आणि टाटा स्टील या कंपन्यांचे समभाग १.७६ टक्क्यापर्यंत वाढले. लंडन मेटल एक्स्चेंजमध्ये धातू निर्देशांक वाढल्याचा लाभ या कंपन्यांना झाला. वेदांचा समभाग ९0.३0 रुपयांवर स्थिर राहिला.या उलट डॉ. रेड्डीजचा समभाग सर्वाधिक ८.२१ टक्क्यांनी घसरला. कंपनीच्या नव्या औषधांची परवानगी स्थगित करण्याचा निर्णय अमेरिकी औषध नियंत्रक घेऊ शकतात, असे वृत्त आल्याने कंपनीला फटका बसला. तत्पूर्वी, मंगळवारी विदेशी गुंतवणूकदारांनी ५४0.१२ कोटी रुपयांचे समभाग विकल्याचे हंगामी आकडेवारीवरून समोर आले. काल गुरुनानक जयंतीनिमित्त बाजार बंद होते. जागतिक पातळीवर आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. युरोपीय बाजारांत मात्र सकाळी तेजीचे वातावरण होते. (वृत्तसंस्था)