Join us

सेन्सेक्स ४७९ अंकांनी उसळला

By admin | Updated: May 4, 2015 23:37 IST

४ महिन्यांच्या नीचांकावर असलेला सेन्सेक्स सोमवारी ४७९ अंकांनी उसळून २७,४९0.५९ अंकांवर बंद झाला. मॅटवर केंद्र सरकारने दिलेले स्पष्टीकरण आणि वाहन

नवी दिल्ली : ४ महिन्यांच्या नीचांकावर असलेला सेन्सेक्स सोमवारी ४७९ अंकांनी उसळून २७,४९0.५९ अंकांवर बंद झाला. मॅटवर केंद्र सरकारने दिलेले स्पष्टीकरण आणि वाहन उद्योगांचे उत्साहवर्धक मासिक निकाल याच्या बळावर शेअर बाजारांनी ही झेप घेतली.गेल्या आठवड्याच्या अखेरीस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मॅट कराबाबत स्पष्टीकरण दिले होते. विदेशी कंपन्यांना रोख्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या सर्व प्रकारचा भांडवली लाभ त्याच प्रमाणे रॉयल्टी, व्याज, तांत्रिक सेवा शुल्क इत्यादींवरील लाभ १८.५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास या लाभांवर किमान पर्यायी कर अर्थात मॅट लागणार नाही, असे जेटली यांनी जाहीर केले होते. याचा सुयोग्य परिणाम आज दिसून आला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एका क्षणी २७,५३७.८५ अंकांपर्यंत वर चढला होता. दिवसअखेरीस तो ४७९.२८ अंक अथवा १.७७ टक्क्यांच्या वाढीसह २७,४९0.५९ अंकांवर बंद झाला. ३0 मार्चनंतरची ही सर्वोच्च एकदिवसीय उसळी ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ५१७.२२ अंकांनी उसळला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी पुन्हा एकदा ८,३00 अंकांच्या पातळीवर गेला आहे. ८,३३१.९५ अंकांवर तो बंद झाला. १५0.४५ अंकांची अथवा १.८४ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. त्या आधी तो ८,३४६.00 अंकांपर्यंत वर चढला होता. स्मॉलकॅप आणि मीडकॅप क्षेत्रातही खरेदीचा जोर दिसून आला. त्याचा परिणाम म्हणून स्मॉलकॅप निर्देशांक २.0६ टक्क्यांनी, तर मीडकॅप निर्देशांक १.२८ टक्क्यांनी वर चढल्याचे दिसून आले. आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. युरोपीय बाजार मात्र सकाळच्या सत्रात तेजीत असल्याचे दिसून आले. तत्पूर्वी गेल्या गुरुवारी विदेशी संस्थांनी भारतीय बाजारांत ३,१५७.६१ कोटी रुपयांचे समभाग विकले. मुंबई शेअर बाजारात सादर करण्यात आलेल्या हंगामी आकडेवारीतून ही बाब समोर आली. (वृत्तसंस्था)