मुंबई : बड्या कंपन्यांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १0४.३७ अंकांनी वाढून २५,८६४.४७ अंकांवर बंद झाला. पॅरिस हल्ल्याचा धक्का ओसरल्यामुळे जागतिक बाजारांत तेजी परतली आहे. त्याचा लाभ भारतीय बाजारांना झाला.अमेरिकेतील वॉल स्ट्रीट हा शेअर बाजार काल जोरात उसळला. त्याचा परिणाम जगातील अन्य बाजारांवर झाला. आशिया आणि युरोपातील सर्व प्रमुख बाजारांत तेजी परतली. भारतीय बाजारांत तेजी असली, तरी गुंतवणूकदार सावध आहेत. ब्ल्यू चीप कंपन्यांची सप्टेंबरमधील कामगिरी सुमार राहिली आहे. तसेच विदेशी संस्थांनी मोठ्या प्रमाणात समभाग विक्री केली आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला आहे. त्यामुळे आज दिवसभर शेअर बाजारात चढ- उतार दिसून आले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २५,९४८.२0 आणि २५,७३२.७९ अंकांच्या मध्ये वर-खाली होताना दिसून आला. सत्राच्या अखेरीस १0४.३७ अंकांची अथवा 0.४१ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २५,८६४.४७ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स १४९.५७ अंकांनी वाढला होता.५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८३७.५५ अंकांवर बंद झाला. ३0.९५ अंकांची अथवा 0.४0 टक्क्यांनी वाढ त्याने नोंदविली. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही दिवसभर वर-खाली होताना दिसून आला. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक २.१७ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल मेटल, हेल्थकेअर, आॅटो आणि पॉवर यांचे समभाग वाढले. व्यापक बाजारांतही तेजीचा माहोल दिसून आला. बीएसई स्मॉलकॅप 0.४७ टक्के, तर मीडकॅप 0.३१ टक्के वाढला. साखर कंपन्यांचे समभागही आज वाढले. जागतिक पातळीवर साखरेच्या किमती वाढल्याचा लाभ या कंपन्यांना झाला. श्री रेणुका शुगर्स, ईआयटी पॅरी, बजाज हिंदुस्तान आणि मवाना शुगर या कंपन्यांचे समभाग १९.२४ टक्क्यांपर्यंत वाढले.
सेन्सेक्स १0४ अंकांनी वाढला
By admin | Updated: November 18, 2015 03:23 IST