नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही राजधानी दिल्लीच्या बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. सोन्याचा भाव २०० रुपयांनी वधारून २७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईच्या काळातली ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेत्यांनी जोरदार खरेदी केली. तिकडे चांदीचा भावही ५५० रुपयांनी उंचावून ३७,३०० रुपये प्रतिकिलोवर आला.व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर समभाग बाजारात मोठी घसरण नोंदली गेली. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सराफा बाजाराला मोठी पसंती दिल्याचे दिसून आले. याचा स्थानिक बाजार धारणेवर सकारात्मक परिणाम झाला. स्थानिक बाजारात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आभूषण निर्मात्यांनी जोरदार खरेदी केली.सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.६ टक्क्यांनी वधारून १,२१२.०१ डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भावही १ टक्क्याने वाढून १६.३५ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. सोन्याच्या भावाने १८ डिसेंबरची उच्चांकी पातळी गाठली.दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २०० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,५०० रुपये व २७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या दोन दिवसांत २७५ रुपयांची वाढ झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही १०० रुपयांच्या तेजीसह २३,८०० रुपये झाला.तयार चांदीचा भाव ५५० रुपयांनी वाढून ३७,३०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ४२५ रुपयांनी उंचावून ३७,२०० रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वाढून खरेदीसाठी ६१,००० रुपये व विक्रीसाठी ६२,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
हंगामी मागणीच्या बळावर सराफ्यात तेजीचा कल
By admin | Updated: January 6, 2015 23:43 IST