मुंबई : गेल्या आठवड्यात चार महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण नोंदविल्यानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सपाट पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवर संमिश्र कल पाहायला मिळाला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २६,४0२.९६ अंकांवर बंद झाला. ५.२५ अंकांची अथवा 0.0२ टक्के वाढ त्याने नोंदविली. शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल ६0५ अंकांनी घसरला होता. ११ फेब्रुवारीनंतची ही सर्वांत मोठी घसरण ठरली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.१0 अंकांनी अथवा 0.0८ टक्क्यांनी वाढून ८,0९४.७0 अंकांवर बंद झाला. त्याआधी तो ८,0३९.३५ आणि ८,१२0.६५ अंकांच्या मध्ये झुलताना दिसून आला. डॉ. रेड्डीज लॅबचा समभाग सर्वाधिक ३.0४ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल एसबीआयचा समभाग २.७७ टक्क्यांनी वाढला. वाढ मिळविलेल्या अन्य बड्या कंपन्यांत सन फार्मा, सिप्ला, लार्सन, आयटीसी आणि अदाणी पोर्ट्स यांचा समावेश आहे. सॉफ्टवेअर सर्व्हिसेस क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांचे समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे दबावात राहिले. सेन्सेक्समधील ३0 पैकी १४ कंपन्यांचे समभाग वाढले. १४ कंपन्यांचे समभाग घसरले. २ कंपन्यांचे समभाग मात्र स्थिर राहिले. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स सपाट
By admin | Updated: June 28, 2016 03:36 IST