Join us

सेन्सेक्स २९६ अंकांनी कोसळला

By admin | Updated: October 8, 2014 03:09 IST

जर्मनीच्या औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे निर्माण झालेल्या घबराटीमुळे मंगळवारी शेअर बाजार धडाधड कोसळले

मुंबई : जर्मनीच्या औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे निर्माण झालेल्या घबराटीमुळे मंगळवारी शेअर बाजार धडाधड कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९६ अंकांनी खाली आला. या पडझडीचा सर्वाधिक फटका टिकाऊ ग्राहक वस्तू आणि यंत्रसामग्री बनविणाऱ्या कंपन्यांना बसला.जर्मनीचे औद्योगिक उत्पादन ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे. यासंबंधीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात निराशेचे वातावरण पसरले. ३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी १३७ अंकांच्या डुबकीसह मंदीत उघडला. त्यानंतर तो खालीच जात राहिला. एका क्षणी २६,२५0.२४ अंकांपर्यंत तो खाली आला होता. नंतर त्यात थोडीशी सुधारणा झाली. दिवस अखेरीस २९६.0२ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,२७१.९७ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी ९३.१५ अंकांनी कोसळून ७,८५२.४0 अंकांवर बंद झाला. व्यावसायिक सत्रादरम्यान तो ७,९४३.0५ ते ७,८४२.७0 अंकांच्या मध्ये खाली-वर होत होता. कोटक सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष संजीव जरबडे यांनी सांगितले की, जर्मनीच्या औद्योगिक उत्पादनाचे आकडे येताच बाजारात विक्रीचा जोर वाढला. युरोपीय बाजारातही विक्रीचा जोर होता. विदेशी गुंतवणूकदारांनी सौद्यांचा निपटारा करण्यास प्राधान्य दिले, तर छोट्या गुंतवणूकदारांनी तिमाही निकालांच्या आधी विक्रीला प्राधान्य दिले. त्यामुळे बाजारातील धारणेवर परिणाम झाला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे शेअर्स खाली आले. शेअर बाजारातील अस्थायी आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या बुधवारी ६३.२४ कोटी रुपये किमतीच्या शेअर्सची विक्री केली होती. (प्रतिनिधी)