मुंबई : कंपन्यांचा तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे येत नसल्यामुळे शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला सुरू झाला आहे. मुंबई शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली असून सेन्सेक्स २५८.५३ अंकांनी खाली येऊन २८,११२.३१ अंकांवर बंद झाला. चीनचे वस्तू उत्पादन क्षेत्र जुलैमध्ये घसरून १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे. याची प्रतिक्रिया म्हणून आशियाई शेअर बाजारांत घसरणीचा कल पाहायला मिळाला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स २५८.५३ अंकांनी अथवा 0.९१ टक्क्यांनी घसरून २८,११२.३१ अंकांवर बंद झाला. ग्राहक वस्तू आणि एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रांत आज घसरण पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स ३९२.६२ अंकांनी घसरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६८.२५ अंकांनी अथवा 0.७९ टक्क्यांनी घसरून ८,५२१.५५ अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स ३५१ अंकांनी अथवा १.२३ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच निफ्टी ८८.३0 अंकांनी अथवा १.0२ टक्क्यांनी घसरला आहे. वस्तू आणि सेवाकराच्या विधेयकासह प्रमुख सुधारणा विधेयके संसदेत अडकून पडल्यामुळे बाजाराची धारणा घसरली आहे. बाजारातील घसरणीचा कल व्यापक होता. बीएसई मिडकॅप 0.६१ टक्क्यांनी घसरला. स्मॉलकॅप 0.५८ टक्क्यांनी खाली आला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले. तत्पूर्वी काल विदेशी गुंतवणूकदारांनी १८५.४२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केल्याचे जाहीर आकडेवारीवरून स्पष्ट झाले. जागतिक बाजारांपैकी युरोपीय बाजारांत सकाळी तेजीचे वातावरण दिसून आले. आशियाई बाजारांत मात्र नरमाईचा कल राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सेन्सेक्स २५९ अंकांनी कोसळला
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST