Join us

सेन्सेक्स २४५ अंकांनी कोसळला

By admin | Updated: April 16, 2015 02:51 IST

शेवटच्या तासात विक्रीचा जोर वाढल्यामुळे बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४५ अंकांनी घसरून २९ हजार अंकांच्या खाली आला.

मुंबई : शेवटच्या तासात विक्रीचा जोर वाढल्यामुळे बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४५ अंकांनी घसरून २९ हजार अंकांच्या खाली आला. आरोग्य, भांडवली वस्तू आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली. गुरुवारपासून कंपन्यांच्या तिमाही कामगिरीचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी गुरुवारी, तर रिलायन्स इंडस्ट्रीज शुक्रवारी आकडेवारी जाहीर करणार आहे. त्याआधी सटोडियांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याचा हा परिणाम असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. त्याआधी ठोक ग्राहक मूल्यावर आधारित महागाईचा दर सलग पाचव्या महिन्यात घसरल्याचे जाहीर करण्यात आले. तथापि, या सकारात्मक बातमीमुळेही बाजाराला दिलासा मिळू शकला नाही. मुंबई शेअर बाजाराचा ३0 कंपन्यांच्या समभागांवर आधारित सेन्सेक्स सकाळी २९,0८७.२५ अंकांसह तेजीने उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २९,0९४.६१ अंकांवर गेला. सत्राच्या अखेरीस मात्र ब्ल्यू चीप कंपन्यांच्या समभागांत प्रचंड विक्री सुरू झाली. त्यामुळे प्रारंभी मिळविलेली वाढ सेन्सेक्सने गमावली. २४४.७५ अंक अथवा 0.८४ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २८,७९९.६९ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग घसरले. ७ कंपन्यांचे समभाग वर चढले. ५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,८00 च्या खाली गेला. ८३.८0 अंक अथवा 0.९५ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ८,७५0.२0 अंकांवर बंद झाला. दिवसभर तो ८,८४0 आणि ८,७२२.४0 या अंकांच्या मध्ये खाली-वर होताना दिसत होता. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी टाटा मोटर्स, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, एम अँड एम, एचडीएफसी बँक आणि भेल या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरले. आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. चीन, जपान, तैवान येथील बाजार घसरले. हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार मात्र वर चढले. युरोपीय बाजारात सकाळी तेजीचे वातावरण दिसून आले. फ्रान्सचा कॅक 0.६0 टक्क्यांनी, जर्मनीचा डॅक्स 0.४४ टक्क्यांनी, तर ब्रिटनचा एफटीएसई 0.३८ टक्क्यांनी तेजीत चालला होता. भारतीय बाजारातील एकूण हालचाल नकारात्मक राहिली. १,४७२ कंपन्यांचे समभाग घसरले. १,३८७ कंपन्यांचे समभाग वर चढले. ९८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले.