Join us

जीएसटी गटाच्या शिफारशींमुळे सेन्सेक्स १0८ अंकांनी घसरला

By admin | Updated: December 8, 2015 01:55 IST

जीएसटी गटाने पानमसाले आणि तंबाखूवर तब्बल ४0 टक्क्यांचा कर सुचविल्यामुळे आयटीच्या समभागात सोमवारी मोठी घसरण झाली.

मुंबई : जीएसटी गटाने पानमसाले आणि तंबाखूवर तब्बल ४0 टक्क्यांचा कर सुचविल्यामुळे आयटीच्या समभागात सोमवारी मोठी घसरण झाली. त्याचा फटका बसून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0८ अंकांनी घसरून २५,५३0.११४ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची ही सलग चौथ्या सत्रातील घसरण असून, निर्देशांक तीन आठवड्यांच्या नीचांकावर गेला आहे.गेल्या बुधवारपासून सेन्सेक्स घसरत आहे. या चार सत्रांत सेन्सेक्सने ६३९.३0 अंक गमावले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्यामुळे बाजार घसरणीला लागला आहे.बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. १४७ अंकांची घसघशीत वाढ त्याने मिळविली होती. त्यानंतर मात्र तो नकारात्मक टापूत गेला. आयटीसीच्या नेतृत्वाखालील कंपन्यांत मोठी विक्री सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स २५,४७७.६९ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस तो १0८ अंकांची अथवा 0.४२ टक्क्याची घसरण नोंदवून सेन्सेक्स २५,५३0.११ अंकांवर बंद झाला. १८ नोव्हेंबर रोजी तो या पातळीवर होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टीही सकाळी तेजीत होता. एका क्षणी ७,८२५.४0 अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस १६.५0 अंकांची अथवा 0.२१ टक्क्याची घसरण नोंदवून निफ्टी ७,७६५.४0 अंकांवर बंद झाला. बीएसई एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक २.४५ टक्क्यांनी घसरला.३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील १६ कंपन्यांचे समभाग घसरले. हीरो मोटोकॉर्पचे समभाग स्थिर राहिले. सिगारेट बनविणाऱ्या आयटीसीचा समभाग सर्वाधिक ६.५७ टक्क्यांनी घसरून ३१३.५५ रुपयांवर बंद झाला.याशिवाय गॉडफ्रे फिलिप्सचा समभाग ४.९0 टक्क्यांनी, तर व्हीएसटीचा समभाग २.८५ टक्क्यांनी घसरला. तेल उत्पादक कंपन्यांचे समभागही विक्रीच्या माऱ्यात होते. कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्यास ओपेक राष्ट्रांनी नकार दिल्याचा परिणाम तेल कंपन्यांच्या समभागांवर झाला. घसरणीचा फटका बसलेल्या अन्य कंपन्यांत कोल इंडिया, ओएनजीची, आरआयएल, मारुती सुझुकी, बजाज आॅटो, एसबीआय, डॉ. रेड्डीज, वेदांता, एनटीपीसी, टीसीएस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे.या उलट सन फार्मा, एचयूएल, लुपीन, टाटा स्टील, एचडीएफसी, गेल, विप्रो, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, अ‍ॅक्सिस बँक आणि भेल यांचे समभाग वाढले.