प्रसाद. गो. जोशी
शेअर बाजारात कोणतीही दिलासाजनक बातमी नसल्याने बाजाराला गत सप्ताहात मंदीने ग्रासलेले दिसले. याचा परिणाम बाजाराच्या निर्देशांकामध्ये सलग दुसऱ्या सप्ताहात घसरण झालेली दिसून आली. संवेदनशील निर्देशांक २८ हजारांच्या खाली गेला असून, आगामी सप्ताहातही बाजार मंदीतच राहण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या पतधोरणामध्ये व्याजदराबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, डेरिव्हेटीव्हजच्या व्यवहारपूर्तीचाही परिणाम बाजारावर होऊ शकतो.गत सप्ताहामध्ये बाजाराला दिलासा देणारी कोणतीही मोठी घटना न झाल्याने भारतीय शेअर बाजारांमध्ये मंदीचेच वातावरण बघावयास मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २९४.९५ अंश म्हणजेच १.०५ टक्क्यांनी घसरला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २७,७८२.२५ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकाला २८ हजार अंशांची पातळी राखता आली नाही. अधिक व्यापक पायावर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही (निफ्टी) घसरण झाली. हा निर्देशांक ९४.३५ अंशांनी खाली येऊन ८५७२.५५ अंशांवर स्थिरावला. निर्देशांकाच्या घसरणीचा हा सलग दुसरा सप्ताह आहे.बाजाराचे प्रमुख निर्देशांक घसरत असले, तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक मात्र सातत्याने वाढ दाखवित आहेत. गत सप्ताहात या निर्देशांकांमध्ये वाढच झालेली दिसून आली. या निर्देशांकातील आस्थापनांना चांगली मागणी असल्याचे दिसते.डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाची घसरण सुरूच असल्याचे दिसून आले. यामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहे. गत सप्ताहात रुपयाचे मूल्य ०.१४ टक्के घसरले. १९ आॅगस्ट रोजी एका डॉलरला ६६.९३ रुपये असलेले मूल्य २६ आॅगस्ट रोजी ६७.०३ रुपये एवढे झाले. रुपयाच्या घसरणीचा परिणाम सॉफ्टवेअर, तसेच माहिती तंत्रज्ञान आस्थापनाच्या समभागांवर झालेला दिसून आला. अमेरिकेच्या आगामी पतधोरणात व्याजदर वाढण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या भाषणात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळेच गुंतवणूकदार, तसेच परकीय वित्तसंस्थांनी गुंतवणूक करताना हात काहीसा आखडता घेतलेला दिसतो. आगामी सप्ताहात डेरिव्हेटीव्हजच्या व्यवहाराची सौदापूर्ती असल्यामुळेही बाजार सावध वाटचाल करीत आहे. परकीय वित्तसंस्थांनी आपली खरेदी कायम ठेवली असली, तरी त्याचा वेग मात्र काहीसा कमी झाला आहे. कर्जरोखे प्रकारात मात्र, या संस्थांनी गत सप्ताहात विक्री केली.