Join us

तेलाच्या धक्क्याने सेन्सेक्स कोसळला

By admin | Updated: June 14, 2014 04:57 IST

इराकमधील अस्थिरतेमुळे तेलाच्या किमती वाढल्या असून, त्याचा फटका शेअरबाजारांना बसला आहे. मुंबई शेअरबाजार व निफ्टी यांची एकाच दिवसात सर्वात मोठी घसरण झाली आहे

मुंबई : इराकमधील अस्थिरतेमुळे तेलाच्या किमती वाढल्या असून, त्याचा फटका शेअरबाजारांना बसला आहे. मुंबई शेअरबाजार व निफ्टी यांची एकाच दिवसात सर्वात मोठी घसरण झाली आहे. ३० शेअर्सचा मुंबई निर्देशांक ३४८.०४ अंकांनी किंवा १.३६ टक्के कोसळला. निर्देशांक घसरून २५.२२८.१७ अंकांवर बंद झाला. ५० शेअर्सचा निफ्टी १०७.८० अंकांनी कोसळला असून ७,५४२.१० वर बंद झाला आहे. ही घसरण १.४१ टक्के आहे. इराकमधील बंडखोरांनी शहरे ताब्यात घेण्याचे सत्र सुरूकेल्याने तेथील परिस्थिती चिघळली, जगातील मोठा तेल उत्पादक देश असणाऱ्या इराकमधील अस्थिरतेचा परिणाम तेल पुरवठ्यावर होऊन तेलाच्या किमती भडकल्या. रुपयाचे मूल्यही घसरले व शेअरच्या मूल्यातही घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ५० पैशांनी घसरला. परदेशी भांडवलाचा ओघही कमी झाला असून, परदेशी गुंतवणूकदारांनी ६५२.३५ कोटी रु चे शेअर्स विकले आहेत. शुक्रवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स चढत्या भाजणीत होता. २५.६७७ .०५ वरून २५.६८८.३१ वर त्याने झेप घेतली; पण सुरुवातीची ही झेप रोखण्यास यश आले नाही. ऊर्जा, कन्झ्युमर ड्युरेबल, धातू, बँक व कॅपिटल गुडस् यांचे शेअर घसरले व निर्देशांक २५,१७१.६१ अंकांपर्यंत खाली आला.नंतर थोडा फार सावरला व २५.२२८.१७ अंकांवर बंद झाला. ही घसरण ३४८.०४ अंकाची असून,१.३६ टक्के आहे. २७ जानेवारी २०१४ नंतर एकाच दिवशी एवढी मोठी घसरण होण्याचा हा पहिलाच दिवस आहे. त्यावेळी निर्देशांक ४२६.११ अंकांनी घसरला होता. (प्रतिनिधी)