Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स पुन्हा २६ हजारांवर

By admin | Updated: July 31, 2014 03:22 IST

गुंतवणूकदारांच्या पाठबळामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ९६ अंकांनी झेप घेत २६ हजारावर पातळी गाठली.

मुंबई : गुंतवणूकदारांच्या पाठबळामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ९६ अंकांनी झेप घेत २६ हजारावर पातळी गाठली. भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीचे शेअर्स वधारल्याने गेल्या तीन दिवसांत आज पहिल्यांदा मुंबई शेअर बाजाराला बळ मिळाले.गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर ९६.१९ अंकांनी झेपावत २६,०८७.४२ वर स्थिरावला. बाजाराची सुरुवात कमजोर होती. गेल्या दोन दिवसांत निर्देशांकात २८०.६२ अंकांनी घट झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) दिवसअखेर ४२.७० अंकांनी वधारत ७,७९१.४० वर स्थिरावला.आयटीसी, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, हिंदाल्कोचे शेअर्सही फायद्यात राहिले. भारती एअरटेलच्या पाठिंब्यामुळे बीएसई आणि निफ्टीला उभारी मिळाली. बीएसई-३० पैकी २३ कंपन्यांचे शेअर्स फायद्यात राहिले, तर ७ कंपन्यांचे शेअर्स तोट्यातराहिले.आशियाई बाजारात सकारात्मक वातावरण होते. तसेच युरोपीय बाजाराची सुरुवात झाली. जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि तैवानचा शेअर बाजारात तेजी होती. तथापि, चीन आणि सिंगापूरच्या बाजारात मंदी होती.मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या सत्रात हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, डॉ. रेड्डीज लॅब, मारुती सुझुकी, सिप्ला, एचडीएफसी, गेल इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँकचे शेअर्स फायद्यात राहिले. तथापि, लार्सन अँड ट्युब्रो, टाटा पॉवर, एसबीआय आणि विप्रोचे शेअर्स घसरले.केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यापासून भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे वाहात आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढली आहे. त्याचा थेट लाभ शेअर बाजारावर झाला आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.(प्रतिनिधी)