Join us

८२.५0 अंकांनी वाढला सेन्सेक्स

By admin | Updated: January 9, 2016 00:57 IST

शेअर बाजारात गेल्या चार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८२.५0 अंकांनी वाढला.

मुंबई : शेअर बाजारात गेल्या चार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८२.५0 अंकांनी वाढला. टाटा मोटर्स, आरआयएल आणि आयटीसी या कंपन्यांचे समभाग वाढल्याचा सेन्सेक्सला लाभ मिळाला.शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही शेअर बाजार घसरल्याचे दिसून आले. सेन्सेक्स तब्बल १,२२६.५७ अंकांनी अथवा ४.६८ टक्क्यांनी, तर निफ्टी ३६१.८५ अंकांनी अथवा ४.५४ टक्क्यांनी घसरला. चीनमधील मंदी आणि प. आशियातील राजकीय संकट याचा परिणाम म्हणून ही घसरण झाली आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २४,९६९.0२ अंकांवर तेजीसह उघडला होता. लवकरच त्याने २५ हजारांचा टप्पा ओलांडला. तथापि, नफा वसुलीचा फटका बसल्यामुळे सत्राच्या अखेरीस तो २५ हजारांच्या खाली २४,९३४.३३ अंकांवर बंद झाला. कालच्या बंदच्या तुलनेत ८२.५0 अथवा 0.३३ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्सने १,३0९.0७ अंक गमावले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील एचडीआयएल, डीएलएफ, ओबेरॉय रिअल्टी, युनिटेक, फिनिक्स, इंडियाबुल्स रिअल इस्टेट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि एनबीसीसी यांचे समभाग सुमारे ५.७६ टक्क्यांपर्यंत वाढले.सेन्सेक्समधील ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. क्षेत्रनिहाय विचार करता रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक २.३१ टक्के वाढला. त्या खालोखाल पॉवर, आईल अँड गॅस, इन्फ्रा, आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक वाढले. व्यापक बाजारातील मीडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे १.३२ टक्के आणि १.२४ टक्के वाढले. (वृत्तसंस्था)