Join us

५१७ अंकांनी वाढला सेन्सेक्स

By admin | Updated: March 31, 2015 01:21 IST

जागतिक पातळीवरील बळकटी आणि सर्व क्षेत्रांतील समभागांत झालेली जोरदार खरेदी यामुळे भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी जोरदार वाढ नोंदविली

मुंबई : जागतिक पातळीवरील बळकटी आणि सर्व क्षेत्रांतील समभागांत झालेली जोरदार खरेदी यामुळे भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी जोरदार वाढ नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५१७ अंकांनी वाढून २७,९७५.८६ अंकांवर बंद झाला. पश्चिम आशियातील अशांततेचा परिणाम होऊन गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात घसरण सुरू होती. या घसरणीला ब्रेक लागला आहे. सर्व महत्त्वाचे निर्देशांक वर चढले. सेन्सेक्स २८ हजार अंकांच्या उंबरठ्यावर आला. त्याआधी इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स २८,0१७.९७ अंकांवर गेलाही होता. बंद होताना मात्र तो थोडा खाली आला. ५१७.२२ अंक अथवा १.८८ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २७,९७५.८६ अंकांवर बंद झाला. या आधी २0 जानेवारी रोजी सेन्सेक्स ५२२.६६ अंकांनी वाढला होता. त्यानंतरची सर्वोत्तम वाढ त्याने सोमवारी नोंदविली.सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २६ कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. ३.५५ टक्क्यांच्या वाढीसह भारती एअरटेलच्या समभागाने सर्वोत्तम कामगिरी बजावली. ३.५२ टक्क्यांच्या वाढीसह एचडीएफसी बँकेचा समभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ ओएनजीसीने ३.३९ टक्क्यांची वाढ नोंदविली. आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एल अँड टी, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, भेल, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे समभाग वाढले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी इंट्रा-डे व्यवसायात पुन्हा एकदा ८,५00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता. सत्रअखेरीस तो ८,४९२.३0 अंकांवर बंद झाला. १५0.९0 अंक अथवा १.८१ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. स्मॉलकॅप आणि मीडकॅप क्षेत्रात मोठी वाढ दिसून आली. स्मॉलकॅप निर्देशांक ३.४0 टक्क्यांनी, तर मीडकॅप निर्देशांक १.९३ टक्क्यांनी वाढला. त्याआधी शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांत ३२0.५२ कोटी रुपयांचे समभाग विकले. या उलट स्वदेशी गुंतवणूकदारांनी ६७४.७६ कोटी रुपयांचे समभाग विकत घेतले. शेअर बाजारात सादर करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.