मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ५१६.५३ अंकांनी उसळून २६ हजार अंकांच्या वर बंद झाला. आरोग्य आणि जमीनजुमला यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचा लाभ सेन्सेक्सला मिळाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १५७ अंकांची उसळी घेऊन ७,९00 अंकांचा टप्पा पार केला. सप्टेंबरमध्ये व्याजदरांत वाढ करण्यासारखी स्थिती नसल्याचे अमेरिकी फेडरल रिझर्व्हने स्पष्ट केले आहे. फेडरलचे अध्यक्ष विल्यम डडली यांनी काल यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर जगभरातील बाजार तेजीत आले आहेत. आशियाई बाजार वाढीसह बंद झाले. वॉल स्ट्रीटही उसळला. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केली जाणार असल्याच्या भीतीमुळे आधीच्या दोन दिवसांत प्रचंड विक्री झाली. त्यामुळे जगभरातील बाजार आपटले.३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो २६,३0२.७७ अंकांपर्यंत वर चढला. सत्राच्या अखेरीस २६,२३१.१९ अंकांवर बंद झाला. ५१६.५३ अंकांची अथवा २.0१ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. १४ आॅगस्ट नंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय वाढ ठरली आहे. काल सेन्सेक्स ३१७.७२ अंकांनी घसरला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयात सुधारणा होत आहे. त्याचाही लाभ सेन्सेक्सला मिळाला, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,९४८.९५ अंकांवर बंद झाला. १५७.१0 अंकांची अथवा २.0२ टक्क्याची वाढ त्याने नोंदविली. आशियाई बाजारांतील बहुतांश समभाग तेजीसह बंद झाले. शांघाय कंपोजिट ५.३४ टक्क्यांनी वाढला. युरोपीय बाजारांत सकाळी तेजी दिसून आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
५१६.५३ अंकांनी उसळला सेन्सेक्स
By admin | Updated: August 28, 2015 03:24 IST