मुंबई : गुंतवणूकदारांच्या करविषयक चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलल्यामुळे निर्माण झालेले सकारात्मक वातावरण, तसेच रुपयात झालेली सुधारणा या बळावर शेअर बाजारांनी शुक्रवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५0६ अंकांनी वाढून २७,१0५.३९ अंकांवर बंद झाला. या सप्ताहात सेन्सेक्स ९४.0८ अंकांनी वर चढला आहे. ही वाढ 0.३५ टक्के आहे. तीन आठवड्यांपासूनच्या साप्ताहिक घसरणीला यामुळे ब्रेक लागला आहे.सकाळी सेन्सेक्स तेजीसह उघडला होता. एका क्षणी तो २७,१९६.२८ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्रअखेरीस २७,१0५.३९ अंकांवर तो बंद झाला. ५0६.२८ अंक अथवा १.९0 टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. ३0 मार्च रोजी सेन्सेक्स ५१७.२२ अंकांनी वाढला होता. गेल्या तीन दिवसांपासून मात्र तो घसरत होता. या तीन दिवसांत सेन्सेक्सने ८९१.४८ अंक गमावले होते. काल तो साडेसहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१९१.५0 अंकांवर बंद झाला. १३४.२0 अंक अथवा १.६७ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. आजच्या तेजीचा सर्वाधिक ५.१८ टक्के वाढीचा लाभ टाटा मोटर्सला मिळाला. सिप्ला, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, बजाज आॅटो, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., अॅक्सिस बँक, आरआयएल, टाटा पॉवर, एलअँडटी आणि आयटीसी या कंपन्यांचे समभागही वाढले. हीरो मोटोकॉर्पचा समभाग मात्र घसरला. बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,८७१ कंपन्यांचे समभाग वाढले. ८२३ कंपन्यांचे समभाग घसरले. १२४ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले.
सेन्सेक्स ५0६ अंकांनी उसळला
By admin | Updated: May 9, 2015 00:34 IST