Join us

सेन्सेक्स वधारला ४४० अंकांनी !

By admin | Updated: August 31, 2016 04:35 IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांंक ४४० अंकांनी वधारला आणि १३ महिन्यांच्या उच्च स्तरावर २८,३४३.०१ वर बंद झाला.

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांंक ४४० अंकांनी वधारला आणि १३ महिन्यांच्या उच्च स्तरावर २८,३४३.०१ वर बंद झाला. तर निफ्टी १३७ अंकांनी मजबूत होउन १६ महिन्यांच्या उच्च स्तरावर पोहचला. बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार आज एकूणच सकारात्मक स्थिती होती. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४४० अंकांनी किंवा १.५८ टक्क्यांनी मजबूत होऊन २८,३४३.०१ वर बंद झाला. २३ जुलै २०१५ नंतर सेन्सेक्सचा हा उच्च स्तर आहे. दिवसभरात हा निर्देशांक २८,०१०.६६ ते २८,४७८.०२ वर राहिला. सेन्सेक्स सोमवारी १२० अंकांनी मजबूत झाला होता. बाजारात आज वाहन कंपन्यांचे शेअर तेजीत होते. बजाज आॅटो, मारुती सुझुकी, हीरो मोटो, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा हे ३.०९ टक्क्यांनी मजबूत झाले. या वर्षी ११ जुलैनंतर सेन्सेक्सची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. त्या वेळी सेन्सेक्स ४९९ अंकांनी मजबूत झाला होता. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांच्या चांगल्या आर्थिक स्थितीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी दृढ झाला. परिणामी, हा बदल झाला आहे. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३६.९० अंकांनी किंवा १.५९ टक्क्यांनी मजबूत होऊन ८,७४४.३५ वर बंद झाला. दिवसभरात तो ८,७५०.६० पर्यंत पोहोचला होता. १५ एप्रिल २०१५ नंतरचा हा उच्च स्तर आहे. त्या वेळी निफ्टी ८,७५० वर बंद झाला होता. जागतिक स्तरावर आशियाच्या अधिकांश बाजारात मजबुती होती. हाँगकाँगचा हँगसेेंगे ०.८५ टक्के, शांघाई कंपोजिट इंडेक्स ०.१५ टक्के, सिंगापूर ०.०६ टक्क्यांनी मजबूत झाले. पण, जपानच्या निक्कीत घसरण दिसून आली. सुरुवातीला फ्रान्स, जर्मनी, लंडन येथील बाजारात मजबुती दिसून आली. देशांतर्गत बाजारात फायद्यात राहिलेल्या शेअरमध्ये एशियन पेंट्स, गेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, विप्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, सन फार्मा, ल्यूपिन, टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस, आयटीसी लि. आणि सिप्ला यांचा समावेश आहे.