Join us

सेन्सेक्स ३२२ अंकांनी तेजीत; निफ्टीही वाढला

By admin | Updated: May 30, 2015 00:01 IST

भारतीय शेअर बाजारांनी शुक्रवारी आश्चर्यकारकरीत्या उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२२ अंकांनी वाढून २७,८२८.४४ अंकांवर बंद झाला.

मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी शुक्रवारी आश्चर्यकारकरीत्या उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२२ अंकांनी वाढून २७,८२८.४४ अंकांवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरांत कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने बाजाराला नवसंजीवनी मिळाली असे सूत्रांनी सांगितले. आजच्या तेजीत वाहन उद्योग आणि बँकांचे समभाग उसळले.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह २७,५५३.0३ अंकांवर उघडला होता. काही वेळाने तो घसरला खरा; पण नंतर तो पुन्हा उसळला. एका क्षणी तो २७,८८८.३२ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्र अखेरीस ३२१.७३ अंकांची अथवा १.१७ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,८२८.४४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा ८,४00 अंकांचा टप्पा पार केला. ११४.६५ अंकांची अथवा १.३८ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,४३३.६५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २६ कंपन्यांचे समभाग वर चढल्याचे दिसून आले. भारती एअरटेलच्या समभागाने सर्वाधिक ५.९८ अंकांची वाढ नोंदविली. त्यापाठोपाठ एमअँडएम, गेल, मारुती सुझुकी आणि कोल इंडियाचे समभाग वाढले. याशिवाय एचडीएफसी बँक, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एलअँडटी, एचयूएल, विप्रो आणि एनटीपीसी या कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. हिंदाल्कोचे समभाग मात्र २.१६ टक्क्यांनी घसरले. युरोपीय बाजारात मंदीचा कल दिसून आला. ग्रीससंबंधीच्या चिंतांचा परिणाम या बाजारांवर दिसून आला. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार सकाळच्या सत्रात 0.२७ टक्के ते १.0८ टक्के खाली चालले होते. आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार 0.११ टक्के ते 0.७५ टक्के घसरले. जपान आणि दक्षिण कोरिया येथील बाजार मात्र 0.0६ टक्के ते 0.१९ टक्के वर चढले. १,४४४ कंपन्यांचे समभाग तेजीतबाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,४४४ कंपन्यांचे समभाग वर चढले. १,२३४ कंपन्यांचे समभाग घसरले. १२१ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून ३,७४७.५१ कोटी रुपये झाली. आदल्या दिवशी ती २,५८३.८९ कोटी रुपये होती.