Join us

पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी ८० ते ११० कोटी पाठविले

By admin | Updated: July 14, 2016 03:32 IST

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळ््यामध्ये पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी जिग्नेश शाह याने सुरू केलेल्या कंपन्यांमध्ये सुमारे ८० ते ११० कोटी रुपये पाठविले आहेत.

डिप्पी वांकाणी,  मुंबईनॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळ््यामध्ये पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी जिग्नेश शाह याने सुरू केलेल्या कंपन्यांमध्ये सुमारे ८० ते ११० कोटी रुपये पाठविले आहेत. सक्त वसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी शाह याला अटक केली. हा अधिकारी म्हणाला की खोट्या व्यवहारांचा खुलासा ना जिग्नेश शाह करू शकला ना या लबाड कंपन्यांचे संचालक. त्यामुळेच शाह याला अटक झाली. शाह याने फिनान्शियल टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची स्थापना केली असून ती एनएसईएलमधील होल्डींग कंपनी आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जागेवर व्यापारी मालाची देवाणघेवाण/ व्यवहार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणून ही कंपनी होती. एनएसईएलच्या गोदामात जो माल ठेवण्यात आला होता तो विकला गेला परंतु २०१३ मध्ये घोटाळा उघडकीस आला तो हा की मुळात गोदामात मालच नव्हता. त्यानंतर १३ हजार गुंतवणूकदारांचे पैसे कंपन्यांनी दिले नाहीत व हा घोटाळा ५,६०० कोटी रुपयांचा झाला.‘‘जिग्नेश शाह याने स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये पैसे बुडविलेल्या कंपन्यांनी ८० ते ११० कोटी रुपये भरल्याचे आम्हाला आढळले आहे. बुडविणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांना आम्ही बोलावले होते. त्यांनी या ८० ते ११० कोटी रुपयांबद्दल समाधानकारक खुलासा केलेला नाही’’, असे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शाह याला मंगळवारी बोलावण्यात आले होते. तो सहकार्य करीत नसून खोट्या व्यवहारांचा तपशीलही देत नाही. सुमारे ११ तास चौकशी केल्यानंतर शाह याला अटक करण्यात आली. हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाने बुधवारी त्याला १८ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.