Join us

शेअर बाजारातील घसरणीचा दुसरा आठवडा

By admin | Updated: October 6, 2014 05:54 IST

चलनवाढीचा धोका कायम असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने कायम ठेवलेले दर, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ५.५ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज, अ

चलनवाढीचा धोका कायम असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने कायम ठेवलेले दर, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ५.५ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज, अमेरिकेतील व्याजदर वाढीची शक्यता, अमेरिकेतील रोजगारामध्ये झालेली चांगली वाढ आणि हाँगकाँग तसेच मध्य पूर्वेत असलेला तणाव यामुळे गत सप्ताहात शेअरबाजारात काहीसे चिंतेचे वातावरण राहिले. वाढलेल्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचे धोरण स्वीकारलेले दिसून आले. असे असले तरी काही निवडक समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झालेली दिसून आली.मुंबई शेअरबाजारात गतसप्ताह मंदिचा राहिला. सप्ताहात केवळ तीनच दिवस व्यवहार झाले. मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६,८५१.३३ ते २६,४८१.३१ अंशां दरम्यान फिरत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २६,५६७.९९ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाची तुलना करता तो ५८.३३ अंश म्हणजे ०.२२ टक्के घसरला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सुद्धा खाली येवून बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ७९४५.५५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा तो २३.३० अंश म्हणजेच ०.२९ टक्के घसरला. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअरबाजारात गत सप्ताहात उलाढाल कमी झाली. या दोन्ही बाजारांमध्ये अनुक्रमे ९२३७.०७ कोटी आणि ४३३८२.०७ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणात चलन वाढीचा धोका असल्याचे सांगत कोणत्याही दरांमध्ये बदल केलेले नाहीत. यावर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर ५.५ टक्के राहण्याची अपेक्षा बँकेने वर्तवली आहे. चलनवाढीच्या दरामध्ये वाढ झाल्यास अर्थव्यवस्थेला संकटाचा सामना करावा लागण्याची भितीही व्यक्त केली आहे. असे असले तरी माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्मिती आस्थापनांच्या समभागांना बाजारात मागणी राहिली. परकीय वित्तसंस्था आणि थेट परकीय गुंतवणुकदारांनीही गुंतवणुकीचा ओघ कमी केलेला दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने या वित्त संस्थांनी थांबा आणि वाट पहा असे धोरण अंगिकारलेले दिसते. हाँगकाँग आणि मध्य पूर्वेतील राजकीय परिस्थिती तणावाची असल्याने त्याचाही जगभरातील शेअरबाजारांवर अनिष्ट परिणाम होत आहे. गत सप्ताहात जाहीर झालेली अमेरिकेची रोजगार विषयक आकडेवारी समाधानकारक आल्याने बाजार सुखावला. आगामी सप्ताहात अमेरिकेतील व्याजदर वाढल्यास तेथील गुंतवणूक वाढू शकते.