Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्सायडर ट्रेडिंगबाबत सेबीची कठोर भूमिका

By admin | Updated: August 26, 2014 00:32 IST

मोठमोठे आर्थिक गैरव्यवहार करणारे आणि इन्सायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करता यावी यासाठी सेबी (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) विचार करीत आहे.

नवी दिल्ली : मोठमोठे आर्थिक गैरव्यवहार करणारे आणि इन्सायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करता यावी यासाठी सेबी (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) विचार करीत आहे.इन्सायडर ट्रेडिंगबाबतचे नियम जवळपास २० वर्षांपूर्वीचे असून त्यांच्यात करावयाचे बदल सेबी मंडळाने त्यांना मंजुरी दिली की महिनाभरात अमलात येतील, असे सेबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. खूप मोठे आर्थिक गैरव्यवहार व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांशी अतिशय कठोरपणे वागण्याचाही निर्णय घेतला आहे. सेबीने नियुक्त केलेल्या मंडळाने (इंटरनॅशनल अडव्हायझरी बोर्ड) ज्या व्यापक सुधारणा सुचविल्या आहेत त्यात इन्सायडर ट्रेडिंगसाठीच्या नव्या नियमांचा समावेश आहे.इन्सायडर ट्रेडिंगचे व्यवहार आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे होतात तसे हे नवे नियम आहेत. तथापि, लबाड लोक नियामक व्यवस्थेची कारवाई चुकविण्यासाठी सध्या असलेल्या नियमांचा गैरवापर करतात. बाजारात इन्सायडर ट्रेडिंग व अन्य प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अपराध्यांना जबर आर्थिक दंड ठोठावून त्यांचे नाव जाहीर करून त्यांना उघडे पाडण्याचीही सूचना आयएबीने केली आहे. मोठ्या इन्सायडर ट्रेडिंगची प्रकरणे सेबीच्या संकेतस्थळासह अन्य माध्यमातून प्रसिद्ध करणे, अशा व्यवहारांतून ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याचीही तरतूद करण्यास आयएबीने सूचना केली. इन्सायडर ट्रेडिंगद्वारे केलेल्या गैरव्यवहारातील कमाईच्या तिप्पट किंवा २५ कोटी रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती अशा गैरव्यवहारात वसूल केली जाईल. संबंधितांची नावे वृत्तपत्राद्वारे जाहीर केली जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)