Join us

सेबी आयटी चमू बळकट करणार

By admin | Updated: March 24, 2015 23:44 IST

तपासासह इतर कामासाठीची तांत्रिक क्षमता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रोखे बाजार नियामक ‘सेबी’ आयटी तज्ज्ञांची (माहिती तंत्रज्ञान) भरती करून आपल्या अधिकाऱ्यांचा चमू बळकट करणार आहे.

नवी दिल्ली : तपासासह इतर कामासाठीची तांत्रिक क्षमता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रोखे बाजार नियामक ‘सेबी’ आयटी तज्ज्ञांची (माहिती तंत्रज्ञान) भरती करून आपल्या अधिकाऱ्यांचा चमू बळकट करणार आहे. आयटी तज्ज्ञांमुळे सेबीला डाटा मायनिंग (माहिती हुडकून काढणे), हेरगिरीची साधने विकसित करण्यासह सायबर हल्ले रोखण्यास मदत मिळेल. हे अधिकारी माहिती विश्लेषण आणि व्यवसाय हेरगिरी साधने विकसित करणार आहेत, तसेच माहिती गहाळ अथवा चोरी होऊ नये यासाठी ते अंतर्गत आयटी सुरक्षा व लेखापरीक्षण प्रणालीचे व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. याशिवाय ते सेबीच्या गरजांशी आनुषंगिक विविध तंत्रज्ञानांचे विश्लेषण करण्यासह केंद्रीय दक्षता आयोग व सरकारसह स्वत: सेबीकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी झाल्यानंतर त्यानुसार प्रकल्प राबविण्यासही मदतही करतील. रोखे बाजारावर निगराणी ठेवणारी ही संघटना या कामासाठी कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषयाचे अभियांत्रिकी पदवीधरांचा शोध घेत आहे. या उमेदवारांकडे संबंधित विषयाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सेबीने पुढील आर्थिक वर्षासाठी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आयटी तज्ज्ञांची भरती करण्यात येणार आहे.४ नवे आर्थिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होत आहे. रोखे बाजारातील गैरप्रकारांची शोधमोहीम आणखी सोपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक आणि प्रभावी वापर करण्याच्या प्रस्तावावर सेबीच्या मंडळाने गेल्या बैठकीत शिक्कामोर्तब केले होते. ४याशिवाय गुंतवणूकदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचीही सेबीची योजना आहे.