नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जावरील व्याज दरात पाव टक्का (०.२५ टक्के) कपात करून नवीन गृहकर्जधारकांना दिलासा दिला आहे. सुधारित दर १३ एप्रिलपासून लागू होतील.अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमधील दोन वेळा करण्यात आलेल्या कपातीचा लाभ बँका ग्राहकांना देत नसल्याचा दोषारोप करीत गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांना फटकारले होते. त्यानंतर खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी लिमिटेडने नवीन आणि जुन्या गृहकर्जधारकांसाठी व्याजदरात ०.२ टक्के कपात करून ९.९ टक्के केला होता.एसबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार महिला ग्राहकांसाठी व्याजदर ९.८५ टक्के असेल. अन्य ग्राहकांसाठी गृहकर्जासाठी व्याजदर ९.९ टक्के असेल. १३ एप्रिल रोजी किंवा त्यानंतर मंजूर होणाऱ्या गृहकर्जासाठी सुधारित व्याजदर लागू असेल. ‘हर घर’ योजनेतहत महिलांसाठी गृहकर्जाचा व्याजदर १०.१० टक्के, तर अन्य ग्राहकांसाठी १०.१५ टक्के होता. एसबीआयने १० एप्रिल रोजी आधार दर कमी करून ९.८५ टक्के केला होता. महिला ग्राहक या स्वत: अर्जदार असाव्यात किंवा पहिल्या सह-अर्जदार असाव्यात किंवा संपत्तीच्या एकमेव किंवा पहिल्या सह-मालकीण असाव्यात. अशा महिला ग्राहकांना नवीन दराचा लाभ मिळेल. एसबीआयने परिवर्तनीय व्याजाने गृहकर्ज घेतलेल्यांसाठी आधार दरानुसार (९.८५ टक्के) व्याजदर १० एप्रिलपासून कमी करण्यात आलेला आहे, असे एसबीआयचे मुख्य सरव्यवस्थापक (रियल इस्टेट हाऊसिंग डेव्हलपमेंट ) जे. लक्ष्मी यांनी सांगितले.
एसबीआयचे गृहकर्ज स्वस्त
By admin | Updated: April 13, 2015 11:37 IST