Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीआय’नेही केली ठेवींच्या व्याजदरात कपात

By admin | Updated: December 6, 2014 01:52 IST

देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) एका वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात २५ बेसिक पॉइंटस्ची कपात केली आहे.

मुंबई : देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) एका वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात २५ बेसिक पॉइंटस्ची कपात केली आहे. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या दोन प्रमुख खाजगी बँकांनी काल मुदत ठेवींवरील व्याजदर घटविले होते. स्टेट बँक आॅफ इंडियाने एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात यापूर्वीच दोन कप्प्यांत कपात केली होती. नवे व्याजदर ८ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियात ठेवलेल्या १ वर्षापेक्षा जास्त; पण ५ वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता ८.५0 टक्के व्याज मिळेल. आधी ते ८.७५ टक्के होते. ५ वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवर ८.२५ टक्के व्याज मिळेल. आधी ते ८.५0 टक्के होते. नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने धोरणात्मक व्याजदरात कोणतीही कपात केली नव्हती. तथापि, येत्या वर्षात व्याजदर कमी होतील, असे संकेत दिले होते.औद्योगिक क्षेत्राकडून असलेली कर्ज मागणी धीमी झाल्यामुळे बँकांकडे पैसा पडून आहे. आणखी ठेवी स्वीकारणे बँकांना परवडेनासे होत आहे. या पार्श्वभूमीवर ठेवींवरील व्याजदरात कपात केली जात आहे. (वृत्तसंस्था)