Join us  

एसबीआयचा करोडो ग्राहकांना झटका! १ एप्रिलपासून 'या' कामासाठी जादा पैसे द्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 3:09 PM

प्रत्येक बँक दर महिन्याला नियमांमध्ये बदल करत असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने १ एप्रिलपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित काही नियम बदलत आहे.

नवं आर्थिक वर्ष सुरू होतं आहे, १ एप्रिलपासून अनेक बँका नवे नियम लागू करणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियानेही नियमात बदल केले आहेत, त्यामुळे आता ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. एसबीआयने आपल्या विविध डेबिट कार्डांसाठी सर्विस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम पुढील आठवड्यापासून लागू करण्यात येणार आहे. 

एसबीआयच्या माहितीनुसार, विविध डेबिट कार्डच्या बाबतीत वार्षिक सर्विस चार्जेस ७५ रुपयांपर्यंत वाढवले आहेत. डेबिट कार्डचे नवीन चार्जेस १ एप्रिल २०२४ पासून लागू होईल. देशातील करोडो लोक एसबीआय डेबिट कार्ड वापरतात. ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीतही SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे.

Post Office ची 'ही' गॅरंटीड स्कीम करेल पैसे दुप्पट; केवळ १००० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

एसबीआय क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डच्या बाबतीत, आता ग्राहकांना देखभाल शुल्क म्हणून २०० रुपये अधिक GST भरावा लागेल. सध्या हे शुल्क १२५ रुपये अधिक जीएसटी आहे. तसेच युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्डच्या बाबतीत १७५ रुपयांऐवजी २५० रुपये आकारले जातील. SBI प्लॅटिनम डेबिट कार्डवर आता २५० ऐवजी ३२५ रुपये आकारले जातील. प्राइड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क आता ३५० रुपयांवरून ४२५ रुपयांपर्यंत वाढणार आहे. सर्व शुल्कांवर स्वतंत्र जीएसटी लागू आहे.

एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या बाबतीतही काही बदल होत आहेत. याबाबत एसबीआय कार्ड्सने माहिती दिली आहे. काही क्रेडिट कार्डच्या बाबतीत, रिवॉर्ड पॉइंट्सशी संबंधित बदल १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. या बदलांतर्गत, काही विशेष क्रेडिट कार्डधारकांना यापुढे क्रेडिट कार्डद्वारे दर पेमेंट करण्यावर रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ मिळणार नाही.

टॅग्स :एसबीआयबँक