मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एमार (एटअअफ) ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून यासंदर्भात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रिया देखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली.प्रधानमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन, दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, केंद्रीय दूरसंचार विभागाचे विशेष सचिव शिवा सेलम आणि एमआर उद्योग समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मध्य-पूर्वेतील देशांमध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणारी एमार ही सौदी अरेबिया सरकारची आघाडीची कंपनी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मध्य-पूर्वेच्या दौऱ्यादरम्यान तेल सुरक्षेच्या बदल्यात अन्न सुरक्षा या सुत्रावर या कंपनीचे सहकार्य घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत गुंतवणूक करण्यास कंपनीने तयारी दाखविली असून या तिन्ही राज्यांत आवश्यक असणारी गुंतवणूक करण्याची कंपनीची क्षमता असल्याचे स्पष्ट केले. कंपनीच्या गुंतवणुकीसंदर्भातील प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण केली जाईल.
सौदीची कंपनी राज्यात गुंतवणूक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:40 IST