Join us
Daily Top 2Weekly Top 5

साठे महामंडळ घोटाळा जालन्यातील तपास सीआयडीकडे

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

साठे महामंडळ घोटाळा

साठे महामंडळ घोटाळा
जालन्यातील तपास सीआयडीकडे
जालना - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या येथील कार्यालयातील ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयांचा अपहार प्रकरणाची चौकशी आता सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. या अपहारप्रकरणी जिल्हा व्यवस्थापकांसह दोघांविरूद्ध आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थीक वर्षात जिल्हा व्यवस्थापक मधूकर बापूराव वैद्य व लोकसेवक अशोक एकनाथ खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयाच्या निधीचा हा अपहार केल्याचे महामंडळाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महामंडळाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक वैद्य व कर्मचारी खंदारे विरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच हे दोघेही फरार झाले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तीन महिन्यानंतरही या दोघा फरार आरोपींना पकडण्यात कदीम जालना पोलिसांना यश आले नाही. आता या प्रकरणाचा तपास औरंगाबाद किंवा मुंबई येथील अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांकडून केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
------------------------------------
आरोपी अद्याप मोकाटच
या प्रकरणात सुमार साडे आठ कोटींचा अपहार केल्याचा ठपका ठेवून गुन्हे दाखल केलेले अधिकारी व कर्मचारी अद्याप मोकाटच आहेत. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही ते दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. तसेच सीआयडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेवून आठ दिवस उलटले आहे. त्यांच्याही हाती हे आरोपी अद्याप लागले नाही.