Join us

गुजरातमधील एस्सार रिफायनरीची ८६ हजार कोटी रुपयांना विक्री

By admin | Updated: June 24, 2017 03:13 IST

एस्सार समूहाने गुजरातस्थित आपल्या रिफायनरीची अखेर विक्री केली आहे. रशियाच्या रोसनेफ्ट कंपनीने ८६ हजार कोटी रुपयांना ही रिफायनरी खरेदी केली

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एस्सार समूहाने गुजरातस्थित आपल्या रिफायनरीची अखेर विक्री केली आहे. रशियाच्या रोसनेफ्ट कंपनीने ८६ हजार कोटी रुपयांना ही रिफायनरी खरेदी केली असून, एलआयसीसह प्रमुख आर्थिक संस्थांच्या मंजुरीनंतर या व्यवहाराचा मार्ग मोकळा झाला आहे. एलआयसीचे एस्सार कंपनीवर १२०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या व्यवहारासाठी एलआयसीची परवानगी मिळणे म्हणजे मोठा अडथळा पार केल्यासारखे आहे. एस्सार समूहाच्या सूत्रांनी सांगितले की, देशातील या मोठ्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या व्यवहारात (एफडीआय) ८६ हजार कोटी रुपयांचा व्यवहार होणार आहे. कंपनीला असा विश्वास आहे की, हा व्यवहार पुढील महिन्यात सुरुवातीलाच पूर्ण होईल. एलआयसीसह प्रमुख २३ आर्थिक संस्थांनी या व्यवहारासाठी परवानगी दिली आहे काय? असा प्रश्न केला असता, एका अधिकाऱ्याने सांगितले की, या आर्थिक संस्थांची परवानगी मिळाली आहे. गेल्या वर्षी गोव्यातील ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादमीर पुतीन यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ आॅक्टोबर रोजी या व्यवहारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वातील २३ वित्त संस्थांनी या व्यवहाराला मंंजुरी दिली आहे. रशियाच्या रोसनेफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आइगॉर सेचिन यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत गुरुवारीच स्पष्ट केले होते की, आता हा व्यवहार पूर्ण झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.