Join us  

बॅँकांचे लॉकर नावापुरतेच ‘सेफ’, आपल्या मौल्यवान वस्तूंना सुरक्षा कवच नसतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:22 AM

मुंबई : घरातील दागदागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित राहाव्यात यासाठी आपण बँकेच्या लॉकरची निवड करतो. पण या वस्तूंचे काही कारणाने नुकसान झाल्यास त्याला बँका जबाबदार नसतातच.

मुंबई : घरातील दागदागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित राहाव्यात यासाठी आपण बँकेच्या लॉकरची निवड करतो. पण या वस्तूंचे काही कारणाने नुकसान झाल्यास त्याला बँका जबाबदार नसतातच. यामुळे ‘सेफ डिपॉझिट व्हॉल्ट’ नेमके किती सेफ, असा प्रश्न निर्माण होतो.खारघर येथे बँक आॅफ बडोदाच्या लॉकर्समधील सामान भुयार खणून चोरल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली. त्यानंतर बँकांमधील लॉकरच्या सुरक्षेबाबत ऊहापोह सुरू झाला. अशावेळी बँकांतील लॉकरमध्ये असलेल्या सामानाची जबाबदारी मात्र बँकांची नसते हे समोर आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या लॉकरचे वार्षिक भाडे ३ हजार रुपयांपासून ते ७ हजार तर खासगी बँकांचे भाडे ५ हजारपासून ते २० हजार रुपये असते. लॉकर्सच्या बदल्यात बँका खातेदारांना साधारण १० हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांची मुदत ठेव किंवा खासगी बँक असल्यास त्या खातेदारांना त्यांचे समभाग घेण्यास सांगते. एवढा खर्च केल्यानंतरही त्या लॉकरमधील आपल्या मौल्यवान वस्तूंना सुरक्षा कवच नसतेच. यासंदर्भात राष्ट्रीयीकृत बँकेतील ज्येष्ठ कर्मचारी विश्वास उटगी यांनी सांगितले की, लॉकरमधील सामानाला सुरक्षा कवच देणे कायद्यानुसारच अशक्यच आहे. याचे कारण लॉकरमध्ये आत काय सामान ठेवायचे, ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे बँका तपासू शकत नाहीत. बँका आणि लॉकरधारक यांचे नाते घरमालक व भाडेकरू यांच्यासारखे असते. उद्या भाडेकरूच्या घरी चोरी झाल्यास त्याची जबाबदारी घरमालकाची नसते. तसेच इथे आहे. बँकेच्या संपत्तीचा विमा असतो. त्यामध्ये लॉकरचादेखील समावेश होतो. पण त्यामध्ये केवळ लॉकरला सुरक्षा कवच मिळू शकते. लॉकरच्या आतील वस्तूसाठी हे सुरक्षा कवच नसते. यामुळे लॉकरमधील सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी कायद्यानेच बँका घेऊ शकत नाहीत.>मौल्यवान वस्तूंचे करावे काय?बँका जर लॉकरमधील सामानाची जबाबदारी घेत नाहीत, तर खातेदारांनी आपल्या मौल्यवान वस्तूंचे करावे काय, असा प्रश्न निर्माण होतो.अशावेळी लॉकरमधील या सामानाचा विमा काढावा लागतो. यात सर्वांत स्वस्त विमा हा मौल्यवान वस्तूंना त्यांच्या किमतीच्या२५ टक्के संरक्षण देणारा असतो. याशिवाय वस्तूंच्या किमतीइतका विमासुद्धा काढता येतो. त्याचा वार्षिक प्रीमियम२ लाख रुपयांवर साधारण २ हजारपासून ३५०० रुपयांपर्यंत असतो. मात्र हे विमा कवच लॉकरचे नसून त्यामधील सामानाचे असते, हे महत्त्वाचे.

टॅग्स :बँकसोनं