Join us  

रुपयाची घसरगुंडी सुरूच; डॉलरच्या तुलनेत गाठली एकाहत्तरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:03 AM

यंदाच्या वर्षात रुपयाच्या मूल्यात 10 टक्क्यांची घसरण

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. आज बाजारातील उलाढाल सुरू होताच रुपया 71 पर्यंत गडगडला. मात्र काही वेळानंतर रुपयाच्या मूल्यात थोडी सुधारणा झाली. त्यामुळे रुपया 70.91 वर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 17 पैशांची घसरण झाली आहे. महिन्याच्या शेवटी डॉलरची वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ याचा परिणाम रुपयावर झाला आहे. गुरुवारी रुपयाचं मूल्य 15 पैशांनी घसरलं. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 70.74 पर्यंत आला. ऑगस्ट महिन्यात रुपयाचं मूल्य 3.30 टक्क्यांनी घसरलं आहे. सध्याच्या घडीला आशियातील सर्व देशांच्या चलनांचा विचार केल्यास, रुपयाची कामगिरी सर्वात वाईट आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे पुन्हा आकर्षित होऊ लागल्यामुळे रुपयाच्या मूल्यात सुधारणा होऊ शकते, असं भाकित अर्थ मंत्रालयाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी बुधवारी वर्तवलं होतं. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वधारुन ते 68 ते 70 होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. मात्र अद्याप तरी रुपया वधारताना दिसत नाही. 2019 मध्ये रुपयाचं मूल्य 10 टक्क्यांनी घसरलं आहे. त्यामुळे आयात, परदेशातील शिक्षण आणि परदेश प्रवास महागला आहे.