Join us

रुपया बनला आशियात बलिष्ठ

By admin | Updated: May 26, 2014 00:29 IST

वाढता भांडवल प्रवाह तथा नव्या सरकारकडूनच्या अपेक्षा यामुळे २०१४ मध्ये आतापर्यंत आशिया खंडात रुपयाने सर्वात मजबूत चलन म्हणून चांगली कामगिरी केली आहे

नवी दिल्ली : वाढता भांडवल प्रवाह तथा नव्या सरकारकडूनच्या अपेक्षा यामुळे २०१४ मध्ये आतापर्यंत आशिया खंडात रुपयाने सर्वात मजबूत चलन म्हणून चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी नीचांकी पातळीवर गेलेला भारतीय रुपया सध्या ११ महिन्यांच्या उच्चांकावर आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत अन्य चलनांच्या विश्लेषणानुसार यंदा आतापर्यंत रुपया ५.३ टक्क्यांनी मजबूत झाला. अन्य आशियाई चलनांच्या तुलनेत रुपया अधिक बळकट आहे. इंडोनेशियाचा रपैया आणि न्यूझीलंडचा डॉलर यांहून अधिक झपाट्याने भारतीय रुपया झेपावला आहे. गेल्या शुक्रवारी रुपया मजबूत होऊन ५८.५२ प्रतिडॉलर झाला. २०१४ च्या सुरुवातीला भारतीय चलन ६१.८ प्रतिडॉलरवर होता. सहा महिन्यांहूनही कमी काळात रुपया ३२७ पैशांनी मजबूत झाला. परदेशी भांडवलाचा प्रवाह वाढल्याने रुपया तेजीत आला. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये रुपया ६८.८० प्रतिडॉलर या खालच्या पातळीवर गेला होता. कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंद्रानिल पॅन यांनी एका अहवालात म्हटले की, निवडणूक निकालानंतर सकारात्मक धारणेमुळे विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह आम्ही ५ अब्ज डॉलरने वाढवून २० अब्ज डॉलरवर नेऊ शकतो. २०१४-१५ मध्ये रुपया ५७ वरून ६१ प्रतिडॉलर या पातळीवर राहिला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुपयात मोठी घसरण झाली होती. ही घसरण थांबविण्यासाठी केंद्र सरकारला प्रचंड कसरत करावी लागली होती. रिझर्व्ह बँकेला चलन बाजारात हस्तक्षेप करावा लागला होता. रिझर्व्ह बँकेने बाजारात स्वत: डॉलर विक्री सुरू केली होती. असे प्रसंग अनेक वेळा गुदरले. वर्षाच्या अखेरीस मात्र रुपया सावरला. नव्या वर्षात तो पूर्णत: स्थिर झाला. आता तो मजबुतीकडे घोडदौड करीत आहे. (वृत्तसंस्था)