Join us

सोने २०० रुपयांनी; चांदी १,०८० रुपयांनी घसरली

By admin | Updated: December 2, 2014 00:11 IST

मागणी घटल्याने सोन्याचा भाव २०० रुपयांनी कमी होऊन २६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर यात ही घट नोंदली गेली.

नवी दिल्ली : मागणी घटल्याने सोन्याचा भाव २०० रुपयांनी कमी होऊन २६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर यात ही घट नोंदली गेली. चांदीचा भावही १,०८० रुपयांनी कोसळून ३४,३०० रुपये प्रतिकिलो राहिला.बाजार विश्लेषकांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ व्यापाऱ्यांची सध्या मागणी घटली आहे. कारण आगामी काळात यात आणखी घट होईल, असे त्यांना वाटते. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथिल केल्यानेही पुरवठा वाढला आहे.अखिल भारतीय सराफा संघटनेचे उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार जैन यांनी सांगितले की, पुरवठा वाढल्याने आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव २५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत येऊ शकतो.सिंगापुरात सोन्याचा भाव २.१ टक्क्यांनी कमी होऊन ११४२.८ डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव ८ टक्क्यांनी घटून १४.४२ डॉलर प्रतिऔंस राहिला.राजधानी दिल्लीच्या बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव २०० रुपयांच्या घसरणीसह अनुक्रमे २६,२०० रुपये व २६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,६०० रुपयांवर कायम राहिला.तयार चांदीचा भाव १,०८० रुपयांनी घटून ३४,३०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६०५ रुपयांनी कमी होऊन ३३,९२० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव ३,००० रुपयांनी कोसळून खरेदीसाठी ५८,००० रुपये व विक्रीकरिता ५९,००० रुपये प्रति शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)