मुंबई : एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर तुमची जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक स्थिती, गुंतवणुकीचे लक्ष्य अशा सर्व गोष्टींची पडताळणी करून तुम्हाला ‘योग्य’सल्ला देण्यासाठी रोबो तंत्रज्ञान सज्ज होत आहे. संवेदनशील अशा गुंतवणुकीच्या क्षेत्रात आता रोबोचा संचार होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांना तांत्रिकदृष्ट्या योग्य सल्ला मिळतानाच दुसरीकडे प्रक्रियेतील वेगही वाढणार आहे. गुंतवणुकीच्या सल्ल्यासाठी सध्या अनेक देशांतून रोबोचे तंत्रज्ञान वापरले जाते. परंतु, भारतामध्ये हा वापर फारच कमी कंपन्यांकडून आणि तोही मर्यादीत प्रमाणात होतो. केवळ तीन ते चार प्राथमिक प्रश्नांपुरता हा वापर मर्यादीत आहे. जगात या तंत्रज्ञानाला वाढता प्रतिसाद लक्षात घेत आता भारतीय कंपन्यांनीही रोबोचा वापर त्याच्या पूर्ण क्षमतेने करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार त्याची नव्याने मांडणी करण्यात येत आहे. गुंतवणुकीसाठी रोबोचे तंत्रज्ञान किती उपयुक्त ठरू शकते याचे विश्लेषण करताना चार्टर्ड अकाऊटंट अजित जोशी म्हणाले की, सध्या देशामध्ये गुंतवणुकीच्या पॅटर्नमध्ये काही उणिवा आहेत. कारण सध्या जर एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल तर योग्य वित्तीय सल्ला घेण्याऐवजी संबंधित व्यक्ती आपल्या मित्राने अथवा नातेवाईकाने काय आणि कशात गुंतवणूक केली आहे, याची माहिती घेत त्यानुसार स्वत:ची देखील गुंतवणूक करतात. यामध्ये आपल्या मित्र अथवा नातेवाईकाची परिस्थिती अथवा जोखीम घेण्याची क्षमता यांचा विचार न करता सरसकट गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल असतो. परिणामी, गुंतवणूक आणि परताव्याचे गणित फसताना दिसते. तर दुसरा पॅटर्न म्हणजे वित्तीय सल्लागार अथवा एखाद्या कंपनीच्या एजंटमार्फत तो ज्या योजनेचे यशस्वी मार्केटिंग करेल, त्या योजनेत गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो. पण या योजनांतही काही लोकांना संबंधित एजंटला ज्या योजनेत कमिशन जास्त असते त्याचीच विक्री करण्याकडे त्याचा कल असल्याचा अनुभव आलेला आहे तर काहीवेळा संबंधित एजंट अथवा सल्लागारालाच योजनेची सखोल माहिती नसल्यामुळे गुंतवणूकदारांची फसगत झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर रोबोमधील विशेष सॉफ्टवेअर मार्फत गुंतवणूकदाराचे विश्लेषण करून योजना सुचविणे अधिक उपयुक्त ठरू शकते असेही जोशी म्हणाले. (प्रतिनिधी)
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी ‘रोबो’चा सल्ला
By admin | Updated: January 18, 2016 00:26 IST