पुणे : मोसमी पाऊस लांबल्याने यंदा देशातील भाताच्या क्षेत्रात चाळीस लाख हेक्टरने घट झाली असून, त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत तांदळाच्या उत्पादनात ३५ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र तांदळाचा मुबलक साठा असल्याने भावात वाढ होण्याची शक्यता नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा बासमती व ११२१ तांदळाच्या भावात किलोमागे तीस ते पन्नास रुपयांची घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे (फॅम) उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली. जून व जुलैचा पंधरवड्यापर्यंत मोसमी पावसाचा जोर नसल्याने यंदा देशातील भाताच्या पेरण्या उरकण्यास सप्टेंबर उजाडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरण्यांचे क्षेत्र १०.४० कोटी हेक्टरवरुन १० कोटी हेक्टरपर्यंत खाली झाले आहे. आंध्रप्रदेश व कर्नाटकातील पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. पुढील महिन्यात देशातून भाताचे पिक हाती येण्यास सुरुवात होईल. यंदा ८.८० कोटी टन तांदळाचे उत्पादन होण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी ९.१५ कोटी टन तांदळाचे उत्पादन झाले होते. त्यात ४ टक्क्यांनी घट होणार आहे. गेल्या वर्षी बासमती तांदळाची निर्यात ४० लाख, तर बिगर बासमती तांदळाची ७० लाख टन अशा ११० लाख टनांची विक्रमी निर्यात झाली होती. यंदाच्या वर्षी अंदाजे तितकीच निर्यात अपेक्षित आहे. तसेच सरकार लेव्ही व योजनांसाठी २.८० कोटी टन तांदळाची खरेदी करणार आहे. गेल्या वर्षी केंद्राने ३ कोटी टन तांदळाची खरेदी केली होती. त्यातील १.६० कोटी टन तांदळाचा साठा शिल्लक आहे.
तांदळाच्या उत्पादनात ३५ लाख टनांनी घट
By admin | Updated: October 8, 2014 03:06 IST